जिहे कठापूरचे पाणी एक वर्षात आंधळी धरणात

रणजितसिंह नाईक निंबाळकर : कितीही लुंगेसुंगे एकत्र आले तरी गोरेंच्या विरोधात लढण्याची लायकी नाही

सातारा – जिहे कठापूर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी एक वर्षात माण तालुक्‍यातील आंधळी धरणात आणणार आणि त्यापुढील एक वर्षात ते पाणी उचलून माण तालुक्‍यातील उत्तर भागातील 32 गावांना देणारच, असा विश्‍वास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला. “लायकी आणि माहिती नसणारे काही महाभाग पाणी आणण्याची भाषा करुन जनतेची दिशाभूल करत आहेत. असे कितीही लुंगेसुंगे एकत्र आले तरी हिंद केसरी जयकुमार गोरेंच्या विरोधात लढण्याची त्यांची लायकी नाही,’ असा टोलाही त्यांनी लगावला.

गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे कठापूर उपसा जलसंयोजनेचे पाणी आंधळी धरणातून उचलून उत्तर माणमधील गावांना देण्यासाठी लागणाऱ्या जॅकवेल पंपहाऊसचे सर्वेक्षण आणि बोअरिंग कामाचा भूमिपूजन समारंभ पार पडल्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार जयकुमार गोरे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता घोगरे, जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण गोरे, भगवानराव गोरे, अर्जुनतात्या काळे, दहिवडीचे नगराध्यक्ष दिलीपराव जाधव, अतुल जाधव, दादासाहेब काळे, जयकुमार शिंदे आणि 32 गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निंबाळकर पुढे म्हणाले, “आमदार जयकुमार गोरेंच्या पाठपुराव्यामुळे आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान ठरल्याप्रमाणे माण आणि खटावमधील एकूण 64 गावांना टेंभू आणि जिहे कठापूर योजनेचे पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आमदार जयकुमार गोरेंनी दूरदृष्टीने विविध योजनांचे येणारे पाणी साठविण्यासाठी हजारो बंधारे बांधून घेतले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत गोरेयांचा माण खटावसह सातारा आणि माढा मतदारसंघातील बहुतांश भागात प्रभाव राहणार आहे. माण खटावची जनता त्यांच्या पाठीशी आहे.

कितीही लुंगेसुंगे एकत्र आले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही.” माझ्या लोकसभा निवडणुकीत कुणी काय उद्योग केले, हे लवकरच बाहेर काढणार असल्याचे सांगून माण खटावच्या विकासात कुठेच कमी पडणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. आमदार गोरे म्हणाले, “”माण खटावमध्ये गेली साडेनऊ वर्षे विविध योजनांचे पाणी आणण्यासाठी जीवाचे रान करतोय. पहिल्या साडेतीन वर्षात उरमोडीचे पाणी खटाव आणि नंतर माण तालुक्‍यातील किरकसालमधून म्हसवडच्या पुढे नेले. जिहे कठापूरसाठीही आघाडीच्या काळापासून प्रयत्न करुन मोठा निधी मिळवला.

युती सरकारने या योजनेच्या वाढीव खर्चाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्याने वेगाने कामे होऊन योजना अंतिम टप्प्यात आली आहे. पाच महिन्यांत या योजनेचे पाणी नेर धरणात आणि त्यानंतर आठ महिन्यात आंधळी धरणात आणण्याचे नियोजन आम्ही केले आहे.” आंधळीतून हे पाणी उचलून उत्तर भागातील 32 गावांना देण्याची योजना सरकारला सादर केली आणि मुख्यमंत्र्यांसह मंत्री गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील यांनी त्वरित सकारात्मक प्रतिसाद दिला.

मुख्यमंत्र्यांकडे टेंभू योजनेचे पाणी माण आणि खटाव तालुक्‍यातील 32 गावांसाठी मागितले. तीन दिवसांपूर्वी त्याबाबत मंत्रालयात महत्वाची बैठक झाली. इथल्या वाचाळवीरांना त्या बैठकीचे निमंत्रणही मिळाले नव्हते. सरकार सत्तेत आले तेव्हा भाजपमध्ये नसणारे आणि माझ्याविरोधात डिपॉझीट जप्त झालेलं बेन कोकलतं फिरतयं. अनेकांचे एकत्र येऊन काहीतरी ठरलय. त्यांचे काहीही ठरले तरी जनता जयकुमारच्या पाठीशी आहे, असा दावा त्यांनी केला.

विधानसभा निवडणुकीत लढाई होईलच. पण आत्ता मी माणच्या उत्तर भागातील 32 गावांसाठी जिहे कठापूरचे पाणी मिळण्यासाठी लढतोय. या कामाची लोकसभा निवडणुकीत चाचपणी झाली, आज सुपारी फुटली आहे आणि टाकेवाडीत या कामाचा लवकरच मांडवही घालणार आहे, असे सांगून गोरे यांनी “जिथं जाईल तिथं गद्दारी करणारे वरकुटेचं बेणं लोकसभेला रणजितसिंह निंबाळकरांचे काम केले असे जीव तोडून सांगत आहे. मायणीकरांचाही हिशोब मी लवकरच करणार आहे. इथली जनता, शेतकरी आणि पाणी माझा पक्ष आहे. इथल्या मातीने आणि जनतेने मला आमदार केलयं.’ असे स्पष्ट केले.

जिहे कठापूर योजनेचे पाणी सहा महिन्यांत नेर आणि वर्षभरात आंधळी धरणात पडून कृष्णा, येरळा आणि माणगंगा नदी जोडली जाणार आहे, असे अधीक्षक अभियंता घोगरे यांनी सांगितले. चे प्रास्ताविक बाबासाहेब हुलगे यांनी केले. शशिकांत गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. सोमनाथ भोसले यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.