पणजी – कॉंग्रेसचे गोव्याचे निरीक्षक पी. चिदंबरम हे काल पुन्हा एक आठवड्याच्या आत तीन दिवसांच्या गोवा भेटीवर आले आहेत. आज कॉंग्रेसहाऊसवर पत्रकारांशी बोलताना त्यांनी गोवा विधानसभेच्या निवडणूक आघाडीच्या संबंधात कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.
ते म्हणाले की माझ्यावर फक्त पक्षाचे पुनरूज्जीवन करणे आणि ब्लॉक पातळीवरील पक्षाच्या समित्यांची रचना करणे एवढीच सध्या जबाबदारी आहे. त्यामुळे निवडणुकीतील आघाडीविषयी मी सध्या कोणतेही भाष्य करणार नाही. त्यांनी आज विविध पातळीवरील कॉंग्रेस नेत्यांशी चर्चा केली. गेल्या भेटीच्यावेळी कॉंग्रेस पक्ष गोव्यातील सर्व 40 जागा लढवणार असल्याचे संकेत दिले होते.
ते म्हणाले की, गोव्यातील वातावरण कॉंग्रेसला पूर्ण अनुकूल आहे. यावेळी बोलताना प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, आम्ही निवडणुकीची रणनिती निश्चित करीत आहोत. त्यासाठी आधी पक्ष संघटना बळकटीचे महत्वाचे काम आम्हाला पूर्ण करायचे आहे.