पुणे : लॉकडाऊन असूनदेखील दुकानाचे शटर बंद करुन सहकारनगर येथे चिकण विक्री होत असल्याचे समोर आले आहे .
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुणे शहरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याची गंभीर दखल घेत पालकमंत्र्यांनी 10 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन जाहीर केला आहे. सुरवातीच्या पाच दिवसांत फक्त दूध आणि मेडिकल दुकान उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे शहरातील सर्व बाजारपेठा ओस पडल्या आहेत. गल्ली बोळातील दुकानेही बंद आहे.
मात्र सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक गजब घटना घडली आहे. येथे चक्क दुकानाचे शटर बंद करुन चिकण विक्री होत आहे. विशेष म्हणजे हे दुकान पोलिस ठाण्यापासून फक्त हाकेच्या अंतरावर आणि मुख्य रस्त्यावर आहे.
पालकमंत्र्यांची सूचना लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिक आणि व्यापाऱ्यांचा विरोध असतानाही लॉक डाऊन जाहीर केला. याची अंमलबजावणी महापालिका , जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडून होत आहे. दुकान उघडले दिसल्यास त्यावर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत.
शहरात सर्वत्र कडकडीत लॉक डाऊन असताना सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मात्र आखाड साजरा करणाऱ्यांना चांगली सोय उपलब्ध करुन दिली गेली आहे. येथील रस्त्या लगतच्या एका बड्या सोसायटीत एका कंपनीचे फ्रेंचाईस असलेले चिकणचे दुकान आहे. या दुकानाचे शटर बंद ठेऊन आतमध्ये कोंबड्यांची कत्तल केली जात होती.
दुकानातील एक कर्मचारी बाहेर उभा राहून ग्राहकांची ऑर्डर घेत होता. ऑडर घेतल्यावर आतील व्यक्तीला तो कोंबडी कापायचे आदेश देत होता. यानंतर कापलेली कोंबडी शटरच्या खालून ग्राहकांना दिली जात होती. सकाळ पासून हा प्रकार येथे सुरु होता. दिवसभर जस जसे परिसरातील नागरिकांना माहिती मिळत होती, तस तसे नागरिक त्यांच्या वाहनांवरुन किंवा चालत दुकानापाशी येत होते. या ग्राहकांना लांब लांब थांबवून त्यांच्या ऑर्डर घेतल्या जात होत्या. येथे दिवसभर गस्त घालणाऱ्या पोलिसांना याची खबर कशी नव्हती हा एक चर्चेचा विषय बनला होता.
दरम्यान, चिकण विक्रेत्यांनी आखाडाची शेवटचा रविवारी दुकान उघडी ठेवण्याची परवानगी प्रशासनाकडे मागितली आहे. याचा निर्णय कदाचीत 5 दिवसांचा लॉक डाऊन पूर्ण झाल्यावर घेण्यात येईल. श्रावण महिना सुरु झाल्यावर महिणाभर चिकण खाता येणार नाही म्हणून नागरिकांचा हिरमोड झाला आहे. तर दुसरीकडे आखाडाच्या शेवटच्या दोन आठवड्यात चिकण, मटण आणि मच्छी विक्रेत्यांची मोठी कमाई होते. लॉक डाऊनमध्ये अगोदरच त्यांचा व्यवसाय तोट्यात गेला आहे. यामुळे किमान आखाडाचे शेवटचे काही दिवस तरी विक्रीला परवानगी मिळावी अशी धडपड विक्रेते करत आहेत.