करोनाच्या पार्श्वभूमीवर शांततेत शासकीय पूजा, अभिषेक
शिक्रापूर -देशासह राज्यात करोना विषाणु संसर्गाच्या सावटामुळे छत्रपती शंभूराजांचे समाधीस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र वढु बुद्रुक (ता. शिरूर) येथे दरवर्षी होणाऱ्या बलिदान स्मरण दिनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा ग्रामस्थांनी निर्णय घेतला होता; मात्र आज छत्रपती संभाजीराजांच्या पुण्यतिथीनिमित्त शिक्रापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर यांच्या हस्ते शासकीय पूजा करून शंभुराजांच्या समाधीपुढे शासकीय मानवंदनाही देण्यात आली आहे.
स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजांच्या बलिदान स्मरण दिनाच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो शंभूभक्त शंभूराजांच्या समाधीस्थळावर नतमस्तक होण्यासाठी येत असतात. याठिकाणी दरवर्षी श्रीगोंदा, नाशिक, पुण्यासह अनेक भागातून शंभूज्योत, पुरंदर ते वढु पालखी सोहळा, हेडगेवार ज्योत येत असतात. शिरूर-हवेली प्रासादिक दिंडी व बंडातात्या कराडकर यांच्या माध्यमातूनही अनेक दिंड्या शंभूराजांच्या समाधीस्थळी येत असतात.
त्याचप्रमाणे विविध गावातून येणारे शंभूभक्त बलिदान दिनाच्या अगोदर महिनाभर बलिदान मास पाळत असतात. बलिदान मास पाळणारे शंभूभक्त शंभूराजांच्या समाधीला मूक पदयात्रेच्या माध्यमातून ग्रामप्रदक्षिणा घालत असतात. यावेळी देखील नेहमी पाच ते सहा हजार शंभुभक्त उपस्थित असतात. तर शंभूराजांच्या समाधीवर हेलीकॅप्टरने पुष्पवृष्टी व गेल्या काही वर्षांपासून शासकीय मानवंदना होत असल्याने ते पाहण्यासाठी लाखो शंभूभक्त उपस्थित असतात.
मानवंदनेसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या पार्श्वभूमीवर करोना विषाणुच्या संसगार्चा धोका असल्याने पुण्यतिथीचे कार्यक्रम रद्द करावेत, आणि स्थानिक पातळीवर फक्त धार्मिक पुजाविधी करावेत, शंभू भक्तांनी गर्दी टाळावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. त्यानुसार वढु बुद्रुक येथे होणारे बलिदान स्मरण दिनाचे नियोजित कार्यक्रम रदद करून वढुतील समाधीस्थळाचे 31 मार्च पर्यंत दर्शनही बंद करण्यात आले आहे. पोलिसांनी संचारबंदीची सक्तीने अंमलबजावणी करीत येथील प्रवेशद्वारेही बंद केली आहेत.
वढू बुद्रुक येथे आज छत्रपती श्री संभाजीराजेंच्या पुण्यतिथीनिमित्त शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर वैरागकर यांच्या हस्ते शंभूछत्रपतींच्या समाधीवर जलाभिषेक, शासकीय पूजा करण्यात आली. उपसरपंच रमाकांत शिवले, संतोष शिवले, सचिन भंडारे, संजय शिवले, पोलीस पाटील जयसिंग भंडारे यावेळी उपस्थित होते. शिक्रापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या उपस्थितीत शंभूराजांच्या समाधीपुढे ग्रामीण पोलिसांनी शासकीय मानवंदना दिली.