मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात; तब्बल दीड कोटींचा धष्टपुष्ट रेडा हे खास आकर्षण
सातारा – येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर स्मार्ट एक्स्पो ग्रुप, सांगलीच्या व्यवस्थापनाखाली व श्रीमंत छ. उदयनराजे भोसले मित्र समूह, जय सोशल फाउंडेशन यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती कृषी, औद्योगिक व वाहन महोत्सवाचे प्रदर्शन दि. 18 ते 22 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.
या महोत्सवामध्ये स्पर्धा, ज्ञान, विज्ञान आणि मनोरंजनाचे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत अशी माहिती या प्रदर्शनाचे संयोजक व स्मार्ट एक्स्पोचे प्रमुख संचालक सोमनाथ शेटे यांनी सांगितले. या प्रदर्शनात कर्नाटक येथील तब्बल दीड कोटी रुपये किंमतीचा धष्टपुष्ट रेडा हे खास आकर्षण असणार आहे. दि. 18 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन होईल. खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह राजमाता कल्पनाराजे भोसले, कृषी तज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, जिल्हा कृषी अधीक्षक, उपविभागीय कृषी अधिकारी गुरुदास काळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, कृषी विकास अधिकारी यांच्यासह स्मार्ट एक्स्पोचे सोमनाथ शेटे, जय फाउंडेशनचे सागर भोसले, प्रीतम कळसकर, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, माजी नगराध्यक्षा रंजना रावत यावेळी उपस्थित राहणार आहेत.
सुमारे 225 स्टॉल या महोत्सवात सहभागी झाले आहेत. कृषी अवजारे, कृषी तंत्रज्ञान, औद्योगिक माहिती, विविध प्रकारच्या नामवंत कंपन्यांची नवीन वाहने यामध्ये पहायला मिळणार आहेत. सातारकरांच्या करमणुकीसाठी आणि मनोरंजनासाठी येथे जत्राही उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. या महोत्सवाच्या कृषी प्रदर्शनाच्या भव्य मंडप उभारणी तसेच प्रदर्शनाच्या स्टॉल उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या महोत्सवामध्ये विशेष आकर्षण म्हणून दि. 19 रोजी सकाळी दहा ते चार या वेळेत विविध देशी -विदेशी जातीचा “डॉग शो’ आयोजीत केला आहे.
याच दिवशी सायंकाळी सात ते रात्री दहा या वेळेत खेळ पैठणीचा असा होम मिनिस्टर कार्यक्रम होईल. दि. 20 रोजी सायंकाळी सात वाजता डॉ. सुभाष कोष्टी यांचा हिप्नॉटिझम, हा खेळ मनामनांचा कार्यक्रम सादर होणार आहे. दि. 21 व 22 रोजी सायंकाळी सात वाजता सरगम फ्यूजन म्युझिक यांचा वाद्य संगीताचा कार्यक्रम होईल. प्रदर्शनाच्या उभारणीत शेटे परिवारातर्फे विशेष सहकार्य मिळत असून सोमनाथ शेटे यांच्या सुविद्य पत्नी रेखा शेटे, संदीप शेटे तसेच या संपूर्ण इव्हेंटचे मॅनेजमेंट पाहणारे व्यवस्थापक सचिन एडके यांची विशेष मदत होत आहे. खवय्यांना येथे मोठी पर्वणी असून बालगोपाळांसाठी मनोरंजन नगरीची उभारणीही अंतिम टप्प्यात आली आहे, असेही सोमनाथ शेटे यांनी सांगितले.