Chhagan Bhujbal – मला शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मोठे केले. मराठा समाजाची मला मदत झाली. जयंत पाटील, अजित पवार या मराठा नेत्यांसोबत मी काम केले आहे. माझे देखील काहीतरी योगदान आहे, म्हणूनच मला संधी दिली गेली.
माझ्या समाजासाठी माझा जीव जाणार असेल तर मला आनंदच आहे, असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
ओबीसी बचाव हे एकच आमचे काम असल्याचेही भुजबळ यांनी म्हटले आहे. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांचा एकेरी उल्लेख करत हल्ला चढवला होता.
त्यावर भुजबळ पुढे म्हणाले, शिवसेनेचा जन्म झाला तेव्हापासून मी समाज कार्यात आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मी शिवसेना सोडली. मराठ्यांनी मला मोठे केले, असे सांगून शिव्या दिल्या जात आहेत. मला शिवसेना पक्ष आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मोठे केले.
“तू जिवंत राहणार नाही, तुझी वाट लावू अशा धमक्या आणि शिव्या मला दिल्या जात आहेत. एकदा नाही, तर अनेकवेळा धमकीचे फोन आणि मेसेज येत आहेत. मी अशा धमक्यांना अजिबात घाबरत नाही.
पोलिसांकडे या संदर्भात तक्रार केली आहे. पोलिस याचे काय ते पुढे बघतील, असे म्हणत भुजबळ यांनी धमकी प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.