हडपसर(विवेकानंद काटमोरे ,प्रतिनिधी) – माजी खासदार स्वर्गीय विठ्ठल तुपे पाटील यांनी आपल्या समवेत काम केले आहे. विठ्ठल पाटील हे सुरवातीला वेगळ्या पक्षात होते,परंतु खासदार आणि आमदार म्हणून काम करत असताना विधायक कामात त्यांनी नेहमीच आपल्याला सहकार्य केले. त्यांनी कधी सत्तेची गुर्मी येऊ दिली नाही. सत्याची कास आयुष्यभर जपत सर्वसामान्य माणूस जोडण्याचे काम त्यांनी केल्याचे आपण जवळून पाहिले आहे. आता हुबेहूब त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत चेतन याभागात काम करत आहे हे पहाता आमदार चेतन पाटील यांचे राजकीय भवितव्य मोठे असल्याचे संकेत खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा व खासदार शरद पवार यांनी केले.
निमित्त होते हडपसर – साडेसतरानळी येथे स्वर्गीय विठ्ठल तुपे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण यावेळी खासदार शरद पवार यांनी माजी खासदार स्वर्गीय विठ्ठल पाटील यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
विठ्ठल पाटील जनता दलाचे काम करत असताना त्यांनी कधीही विधायक कामाला अडथळा निर्माण केला नाही. तसे पाहिले तर हडपसर भागात वेगवेगळ्या पक्षांची लोक काम त्यावेळी करत होती,परंतु एखादे विधायक काम करायचे म्हटलं की सर्व मतभेद बाजूला सारून ते एकत्र यायचे आणि त्याचे नेतृत्व नेहेमीच पाटलांकडे असायचे. स्पष्टपणे बोलणे, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्यासाठी लढत राहणे, विशेषतः त्यांनी कधीही सत्तेची गुर्मी येऊ दिली नाही ,नेहमीच जमिनीवर पाय रोवून त्यांनी काम केले. अगदी तसेच काम आमदार म्हणून चेतन तुपे करत आहेत. असे यावेळी शरद पवार यांनी सांगितले.
लोकांनीही जो विश्वास यापूर्वी स्वर्गीय खासदार विठ्ठल तुपे पाटील यांना देऊन खासदार केले होते. तोच विश्वास लोकांनी चेतनच्या पाठीमागे उभा केल्याचे चेतन तुपे आमदार झाल्यानंतर मी पहात आहे. त्यामुळे विठ्ठल पाटलांच्या मागे तसेच काम सुरू ठेवल्याने आमदार चेतन तुपे पाटील यांचे राजकीय भवितव्य मोठे आहे. असे खुद्द शरद पवार यांनी सांगत आज हडपसर भागातील समकालीन राजकीय विरोधक आणि सत्तेतील सहकाऱ्यांचे कौतुक केले.
……आता दिलेला शब्द पाळा !
साधना सहकारी बँकेचा आदर्श इतर बँकांनी घ्यायला हवा. बँकेचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. सातत्याने बँक ऑडिट वर्ग अ जपत आहे हे कौतुकास्पद आहे असे सांगतानाच खासदार शरद पवारांनी व्यासपीठाकडे पहात आपली एक तक्रार असल्याचे मिश्कीलपणे नमूद केले. साधना बँकेचा मी मान्यवर सभासद आहे. साधना बँक सभासदांसाठी वेगवेगळ्या उपक्रमातून मदत करते ,तसाच एक उपक्रम आहे आणि तो म्हणजे एक अपत्य असलेल्या सभासदाला बँक दहा हजार रुपये अनुदान देते, मात्र ,मला ते अद्यापही मिळाले नाही त्यामुळे आता तो शब्द पाळा! असे शरद पवार मिश्कीलपणे बोलले, तेव्हा साधना बँकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात उपस्थितांमध्ये एकच हसा पिकला.