Rain Updates : राज्यातील या भागात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई – बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पुढचे 2 ते 3 दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये जास्त प्रभाव असेल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दापोलीलाही पावसाने झोडपले आहे. यवतमाळसह नेर तालुक्यातील गावांत गारपीट झाली. वाई हातोला, आनंद नगर, टाकळी सलामी, पिंपरी कलगा, माणिकवाडा गावांना गारांचा तडाखा बसला आहे. यासोबत आर्णी, पुसद, उमरखेडमध्येही जोरदार पाऊस बरसला. सध्या पीकपरिस्थिती चांगली असली तरी गारपिटीमुळे पिकांना तडाखा बसू शकतो. महसूल प्रशासन पीक नुकसानीचा अहवाल प्रशासनाला सादर करणार आहे.

नांदेडमधील विष्णूपुरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने प्रकल्पाचे 7 दरवाजे उघडण्यात आलेत. त्यामुळे पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात करण्यात येतोय. सध्या 2 हजार 436 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

परभणी जिल्ह्यासह शहरात जोरदार पाऊस बरसला. तर सेलू तालुक्यातील कूपटा भागालाही मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे सेलू कूपटा रोडवरील काही गावांचा संपर्क तुटला. तर पालम शहरालगत असलेल्या लेंढी नदीला पूर आला. त्यामुळे जांभूळ बेटाकडे जाणा-या 5 गावांचा संपर्क तुटल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय.

परभणी जिल्ह्यात बैल पोळ्याच्या सणालाच एका शेतकऱ्याची बैलजोडी पुरात वाहून जाता जाता वाचली. सेलू तालुक्यातील कुपटा गावातल्या गणेश शिंपले बैलांना घेऊन घरी येत होते. मात्र गावाबाहेरच्या ओढ्याला पूर होता. गणेश शिंपलेंनी पूल ओलांडायचा प्रयत्न केला. ओढ्यावरचा पूल तुटलेला असल्याने एका पाठोपाठ दोन्ही बैल पुरात वाहू लागले. सुदैवाने काही अंतरावर बैल पुरातून बाहेर आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.