पुणे – राज्यात करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद या शहरांची परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे कठोर निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली असून राज्यातील काही शहरांमध्ये लॉकडाऊन करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या चर्चेत घेण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिले.
करोना बाधितांची राज्यात रोज विक्रमी संख्या समोर येत आहे. यात विशेषत: मुंबई, पुणे, नागपूरची स्थिती चिंताजनक आहे. राज्यात 2 लाख 10 हजार सक्रिय बाधित असून त्यातील 85 टक्के लक्षणविरहित आहेत. करोनाचा मृत्यूदर 0.4 टक्के आहे. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी राज्यात होत आहे. सध्या पुरेशा प्रमाणात बेड उपलब्ध आहेत. मात्र, वाढती संख्या लक्षात घेता आणखी तयारी करावी लागणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.
निवडणुका असणअरी राज्ये, गुजरातमध्ये आयपीएल मॅचेस सुरू आहेत तेथे आचारसंहितेची अंमलबाजवणी होत नाही. त्यामुळे संसर्ग वाढत असल्याचे सांगून टोपे म्हणाले, सध्याच्या निर्बंधांची सक्तीने अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. लक्षणविरहीत रुग्णांना गृहविलगीकरणाचा सल्ला दिला आहे. सोसायटीतील सदस्यांनीही त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवे आहे. संस्थात्मक विलणीकरण वाढवण्यावर भर दिला जात आहे. करोनाला रोखण्यासाठी सर्व स्थानिक प्रशासनाला नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले.
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची रुग्ण वाढीची टक्केवारी कमी आहे. आपली 80 टक्के असेल तर इतर ठिकाणी 200 टक्के असल्याचे टोपेंनी सांगितले. खासगी हॉस्पिटलमध्ये कोविड रुगांसाठी 80 टक्के खाटा ठेवण्यात येतील. डॅश बोर्ड नियमितपणे अपडेट केला जाईल. रुग्णाला उपचार मिळेल याला प्राधान्य असेल, असेही टोपे म्हणाले.
17 लाख डोस तयार होऊ शकतात
आतापर्यंत राज्यात 45 लाख नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालले आहे. रोज सरासरी 3 लाख लोकांचे लसीकरण होत आहे. तसेच 45 वर्षांखालील लोकांचेही लसीकरण होणे आवश्यक आहे. पुढील तीन महिन्यांत लसीकरण पूर्ण करण्याचा उद्देश आहे. हाफकीनमध्ये लसीच्या निर्मितीला परवानगी मिळावी, आम्ही तिथे 17 लाख डोस तयार करू शकतो, अशी माहिती टोपे यांनी दिली.
आकडे लपवले नाहीत
महाराष्ट्रात करोना रुग्णाच्या आकडेवारीत कुठलीही लपवाछपवी होत नाही. इतर राज्यात बहुदा आकडे लपवले जात असतील, अशी शंका टोपे यांनी व्यक्त केली. कारण काही राज्यात निवडणुक होत आहे. मोठ्या सभा होत आहेत. पण तिथली रुग्णसंख्या कमी आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र अन्य राज्यांच्या तुलनेत मोठे राज्य आहे. महाराष्ट्रात साडे बारा कोटी लोक राहतात. त्यामुळे तुलना करायची झाल्यास रुग्णसंख्येत महाराष्ट्राच्या पुढेही काही राज्य असल्याचे टोपे यांनी सांगितले.