बंगळुरु – कर्णधार फाफ डुप्लेसी व ग्लेन मॅक्सवेल यांच्या वादळी फलंदाजीनंतरही अन्य फलंदाजांनी केलेल्या निराशेमुळे रॉयल चॅलेंजर बंगळुरुला आयपीएल स्पर्धेत सोमवारी अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जकडून अवघ्या 8 धावांनी पराभव पत्करावा लागला.
चेन्नईने विजयासाठी दिलेल्या 227 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरुच्या डावाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. सलामीवीर स्टार फलंदाज विराट कोहली 6 धावांवर बाद झाला. पाठोपाठ महिपाल लोमरोरनेही निराशा केली. यावेळी बंगळुरुच्या 2 बाद 15 धावा अशी बिकट स्थिती बनली होती. मात्र, त्यानंतर सबकुछ कर्णधार फाफ डुप्लेसी व ग्लेन मॅक्सवेल असेच चित्र होते. या जोडीने आपापली अर्धशतके पूर्ण करताना संघाचे शतकही फलकावर लावले.
त्याचबरोबर तिसऱ्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली. संघाच्या डावातील 10 षटकांचा खेळ झा तोपर्यंत बंगळुरुने 2 बाद 121 अशी भक्कम मजल मारली होती. त्यावेळी मॅक्सवेल 61 तर डुप्लेसी 53 धावांवर खेळत होते व त्यांना विजयासाठी 10 षटकांत 106 धावांची आवश्यकता होती. मॅक्सवेल सातत्याने षटकार खेचण्याच्या प्रयत्नात 36 चेंडूत 3 चौकार व 8 षटकारांच्या मदतीने 76 धावांवर बाद झाला व चेन्नईच्या जीवात जीव आला. मात्र, एका बाजुने डुप्लेसी भक्कमपणे फलंदाजी करत होता. त्याच्या जोडीला आलेल्या शाहबाज अहमदने सुरेख साथ देत संघाचे दीडशतक फलकावर लावले. यावेळी मोईन अलीने डुप्लेसीला बाद केले.
डुप्लेसीने 33 चेंडूत 5 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 62 धावांची खेळी केली. आता खेळपट्टीवर शाहबाजसह दिनेश कार्तिक फलंदाजी करत होता व त्यांना विजयासाठी 36 चेंडूत 68 धावांची गरज होती. या जोडीने 32 धावांची भागीदारी केली. मात्र, याचवेळी कार्तिक 14 चेंडूत 3 चौकार व 1 षटकार फटकावताना 28 धावांवर परतला. यानंतर वेन पार्नेलही साफ अपयशी ठरला.
आता अखेरच्या षटकात बंगळुरुला 19 धावांची गरज होती. या षटकात सुयश प्रभुदेसाईने षटकार खेचत संघाचे द्विशतक फलकावर लावताना रंगत निर्माण केली होती. मात्र मथिशा पथिरनाने त्याला बाद करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, डेव्हन कॉनवे व शिवम दुबे यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने मर्यादीत 20 षटकांत 6 बाद 226 धावा केल्या. कॉनवे व दुबे यांनी अफलातून अर्धशतकी खेळी केल्या. रॉयल चॅलेंजर बंगळुरुचा कर्णधार फाफ डुप्लेसीने नाणेफेक जिंकत चेन्नई सुपर किंग्जला पहिल्यांदा फलंदाजी दिली. चेन्नईच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. भरात असलेला सलामीवीर फलंदाज ऋतूराज गायकवाड अवघ्या 3 धावा काढून बाद झाला. त्यानंतर डेव्हन कॉनवेला साथ देत अजिंक्य रहाणेने संघाचा डाव सावरला व अर्धशतक फलकावर लावले. संघाची धावसंख्या 90 असताना रहाणे बाद झाला. 20 चेंडूत 37 धावांची खेळी करत रहाणेने 3 चौकार व 2 षटकार फटकावले. कॉनवेने आपले अर्धशतक थाटात पूर्ण केले. त्याला साथ देत शिवम दुबेनेही आक्रमक फलंदाजी केली. या जोडीने संघाला दीडशतकी मजल मारून दिली. या जोडीने 9 ते 15 या षटकांत तब्बल 68 धावा काढल्या. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 80 धावांची भागीदारी केली. कॉनवेला शतक पूर्ण करण्याची संधी होती. मात्र, तो 83 धावांवर बाद झाला.
या खेळीत त्याने 45 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार व 6 षटकारांची आतषबाजी केली. दुबेनेही अर्धशतक पूर्ण केले. यानंतर तो देखील लगेचच बाद झाला. त्याने 27 चेंडूत 2 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने 52 धावांची खेळी केली. स्थिरावलेले हे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतरही अम्बाती रायडू व मोईन अलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रायडू चांगला खेळत होता. मात्र, तो देखील धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात 6 चेंडूत 1 चौकार व 1 षटकारासह 14 धावा करुन परतला. मोईन अलीने रवींद्र जडेजाला साथिला घेत संघाचे द्विशतक फलकावर लावले. या जोडीने 26 धावा जोडल्या.
जडेजाने षटकार मारण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली व अखेरचे दोन चेंडू खेळण्यासाठी कर्णधार धोनी खेळपट्टीवर आला. त्याने एक धाव काढत मोईनला स्ट्राईक दिली व त्यानेही एक धाव घेत संघाला 20 षटकांत 6 बाद 226 असा धावांचा डोंगर उभारुन दिला. मोईनने 9 चेंडूत 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 19 धावा केल्या. तर धोनीने नाबाद 1 धाव केली. बंगळुरुकडून अखेरच्या षटकात हर्षल पटेलने केवळ दोनच चेंडूंची गोलंदजी केली व त्रास होत असल्याने उरलेले चार चेंडू ग्लेन मॅक्सवेलने टाकले.
मलिंगा शैलीच्या गोलंदाजाला संधी
चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने या सामन्यात श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पथिरना याला संधी दिली. केवळ दोनच सामने खेळयचा अनुभव असूनही धोनीने त्याच्यावर विश्वास दर्शवला. श्रीलंकेचाच यॉर्कर किंग लसित मलिंगा याच्यासारखीच गोलंदाजीची शैली असल्याने पथिरना लोकप्रिय आहे. तसेच मलिंगा प्रमाणे त्याचेही यॉर्कर चेंडू घातक आहेत.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्ज – 20 षटकांत 6 बाद 226 धावा. (रवींद्र जडेजा 10, अम्बाती रायडू 14, अजिंक्य रहाणे 37, शिवम दुबे 52, डेव्हन कॉनवे 83, मोईन अली नाबाद 19, महेंद्रसिंह धोनी नाबाद 1, वनिंदू हसरंगा 1-21, ग्लेन मॅक्सवेल 1-28, महंमद सिराज 1-30, हर्षल पटेल 1-36, वेन पार्नेल 1-48, विजयकुमार वैशाक 1-62). रॉयल चॅलेंजर बंगळुरु – 20 षटकांत 8 बाद 218 धावा. (शाहबाज अहमद 12, सुयश प्रभुदेसाई 19, दीनेश कार्तिक 28, फाफ डुप्लेसी 62, ग्लेन मॅक्सवेल 76, तुषार देशपांडे 3-45, मथिशा पथिरना 2-42).
लक्षवेधी
कर्णधार डुप्लेसी व मॅक्सवेलची वादळी खेळी व्यर्थ
मोक्याच्या क्षणी दिनेश कार्तिककडूनही निराशा
चेन्नईकडून क्षेत्ररक्षणात चुका
कर्णधार धोनीसह ऋतुराज व राहणेनेही सोडले झेल
देशपांडे व पथीरनाने महत्त्वाच्या क्षणी घेतले बळी