पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – वैद्यकीय उपचारासाठी पुण्यात आलेल्या आखाती देशातील नागरिकांना लुटणाऱ्या दिल्लीतील चोरट्यांना पकडण्यात आले. पुणे ते दमण मार्गावर तब्बल सहाशेपेक्षा जास्त सीसीटीव्हीची तपासणी करून कोंढवा पोलिसांनी ही कारवाई केली. हे चाेरटे इराणी टोळीतील असून, ते अरबी भाषेत आखाती देशातील नागरिकांशी संवाद साधत होते. चोरट्यांकडून तीन हजार डाॅलर, ५०० सौदी रियाल, ५३ हजार रुपये आणि मोटार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सिकंदर अली शेख (वय ४४), करीम फिराेज खान (२९), इरफान हुसेन हाश्मी (४४), मेहबूब हमदी खान (५९, चौघे रा. दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत सालेह ओथमान अहमद (५२, रा. येमेेन) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सालेह अहमद यांनी पत्नीला वैद्यकीय उपचारासाठी पुण्यात आणले होते. आखाती देशातून पुण्यात येणरे बहुसंख्य नागरिक कोंढवा भागात वास्तव्यास आहेत.
त्यांना हिंदी येत नाही, त्यांचा पेहराव वेगळा असल्याने ते पटकन नजरेस येतात, अशी माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी दिली.
अहमद हे दि. ८ फेब्रुवारी रोजी कोंढव्यातून निघाले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना अडवले आणि पोलीस असल्याचे सांगून लुटले. हे आरोपी मोटारीतून पसार झाल्याचे सीसीटीव्हीत आढळले होते. पोलिसांनी जवळपास ६०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते. हे चोरटे पुण्यातून पसार होऊन दमणपर्यंत मोटारीतून गेल्याची माहिती तपासात मिळाली.
सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस कर्मचारी सुहास मोरे, राहुल थोरात यांनी चोरट्यांचा माग काढला. पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मानसिंग पाटील, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, अंमलदार अमोल हिरवे, जयदेव भोसले, राहुल थोरात, अभिजीत रत्नपारखी, अभिजीत जाधव, शशांक खाडे, विकास मरगळे, आशिष गरूड, रोहित पाटील, अक्षय शेंडगे, राहुल रासगे यांनी ही कारवाई केली.
साडेतीनशे कि.मी. प्रवास अन् हाॅटेलमध्ये छापा
कोंढव्यात परदेशी नागरिकाला लुटून चोरटे पसार झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले. मोटार द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाका, मुंबई, चारोटी टोलनाका, डहाणूमार्गे दमणकडे गेल्याचे आढळून आले.
आरोपी तेथील एका हाॅटेलमध्ये मुक्कामास थांबले होते. हाॅटेलमध्ये आरोपींनी त्यांचे ओळखपत्र दिले होते. पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर होते. ओळखपत्र आणि हाॅटेलमधील नोंदीवरुन आरोपींची ओळख पटली. पोलिसांनी पुणे ते दमण असा साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास करुन चोरट्यांना ताब्यात घेतले.