पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – चंद्रपूर शहरात पहिल्या ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, ते एक ते तीन मार्च या कालावधीत होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात वन्यजीव संवर्धनविषयक विविध चर्चासत्र, स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीवरच्या विविध स्पर्धा, लघुपटांचे आणि छायाचित्रांचे प्रदर्शन, कवीसंमेलन तसेच जागतिक कीर्तीच्या कलाकारांचे कार्यक्रम होणार आहेत.
याशिवाय विविध देशांच्या वाणिज्य दूतावासाचे उच्चाधिकारी, विविध राज्यांचे वनमंत्री यांनाही या महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले आहे. जागतिक वन्यजीव दिनानिमित्त (तीन मार्च) हा महोत्सव होणार असून, तो सर्व नागरिकांसाठी खुला आहे.
सध्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा देशातला आघाडीचा व्याघ्र प्रकल्प आहे. येथील जैवविविधतेमुळे हा व्याघ्र प्रकल्प वन्यजीवप्रेमींमध्ये अतिशय लोकप्रिय असून दरवर्षी दोन लाखांपेक्षा अधिक पर्यटक ताडोबाला भेट देतात. यात परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. ताडोबाला जागतिक पटलावर आणखी मोठ्या प्रमाणावर पुढे आणणे, हा ताडोबा महोत्सवाच्या आयोजनामागचा प्रमुख उद्देश
आहे.
मिस वर्ल्ड स्पर्धेत यावर्षी सहभागी होणारे स्पर्धक या महोत्सवात सहभागी होऊन व्याघ्र संवर्धनाचा संदेशही जगभरात पोहोचवणार आहेत. या महोत्सवातच २३ फेब्रुवारी हा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा स्थापना दिवस साजरा केला जाणार आहे. आहे. तोसुद्धा आपण या महोत्सवात साजरा केला जाणार आहे.
असे असेल महोत्सवाचे स्वरूप
– ताडोबा महोत्सवानिमित्त वन्यजीव संवर्धन या विषयावर विविध चर्चासत्रे. यामध्ये संवर्धनाच्या क्षेत्रात देशभरात काम करणारे संशोधक, तज्ज्ञ, अनेक एनजीओंचे प्रमुख, वन्यजीव पर्यटन क्षेत्रातल्या संस्थांचे प्रमुख यांचा सहभाग. शिवाय ताडोबाच्या बफर क्षेत्रातल्या गावांचे सरपंच, उरसरपंच आणि ग्राम पारिस्थितिकी समितीचे सदस्य सहभागी होणार.
– खाजगी उद्योगसमूह आणि कंपन्यांच्या सीएसआर निधीच्या पाठबळासाठी महोत्सवात सीएसआर कॉन्क्लेव्हचे आयोजन केले असून त्यात देशातल्या नामवंत कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
– फोटो वॉक, रन फॉर कन्झर्व्हेशन आणि सायक्लॉथॉन हे उपक्रम होणार आहेत. यातून वन्यजीव संवर्धनाचा संदेश घेऊन जनजागृती केली जाणार आहे.
– वन्यजीव विषयावरच जिल्ह्यातल्या शाळांमध्ये वक्तृत्व, निबंध, चित्रकला, रिल बनवणे, छायाचित्र स्पर्धा भरवण्यात येणार आहेत. या शिवाय ट्रेझर हंट ही सांघिक स्पर्धासुद्धा होणार आहे.
– ताडोबाचे कॉफी टेबल बुक, ताडोबा डायरीजची कलेक्टर्स एडिशन, ताडोबामधील गवतांच्या प्रजातीवरील पुस्तक, ताडोबाचा जैवविविधता नकाशा, सीएसआर बुकलेट या साऱ्याचे प्रकाशन केले जाणार आहे. तसेच ताडोबावरील लघुपटांचे आणि छायाचित्रांचे प्रदर्शनही पहायला मिळणार आहे.