लोहमार्ग पोलीस परिक्षेत मुन्नाभाई स्टाईल कॉपी; औरंगाबाद येथील उमेदवारास अटक

पुणे – लोहमार्ग पोलिसांच्या लेखी परिक्षेत इलेक्‍ट्रॉनिक्‍स गॅझेटव्दारे कॉपी करणाऱ्या उमेदवारास स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. या गॅझेटव्दारे मित्राशी बोलून तो प्रश्‍नाचे उत्तर लिहून घेत होता. मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातील नायकही अशा प्रकारे परिक्षा देताना दाखवण्यात आला होता. मात्र खऱ्या आयुष्यातील मुन्नाभाईला आता जेलची हवा खावी लागणार आहे.

जीवन फंडुसिंग गुणसिंगे( रा.वैजापुर, औरंगाबाद) असे अटक आरोपीचे नाव आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार लोहमार्ग पोलीस भरतीसाठी रविवारी लेखी परिक्षा होती. या परिक्षेत गुलटेकडी येथील कटारिया हायस्कुलमध्ये गुणसिंगे याचा नंबर लागला होता. दुपारी तो परिक्षा केंद्रामध्ये गेला. यावेळी तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याने जवळ कोणतीही वस्तू नसल्याचे सांगितले होते.

परिक्षा सुरु झाल्यावर त्याने इलेक्‍ट्रॉनिक्‍स डिव्हाईस काढले. याव्दारे मित्राला प्रश्‍न सांगून त्याच्याकडून उत्तर माहिती करुन घेत असताना तो रंगेहाथ सापडला. हे गॅझेट पोलिसांनी जप्त करुन त्याला अटक केली. हे एक इलेक्‍ट्रॉनिक्‍स डिव्हाईस असून त्यामध्ये सिमकार्ड टाकून कॉल करण्याची सोय आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.