करोनाच्या साथीदरम्यान बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीजनी आपापल्या परिने मदतकार्यात योगदान दिले आहे. सोनू सूद, कंगना रणावत, अक्षय कुमार,जॅकलीन फर्नांडिस, अमिताभ बच्चन यांच्याबरोबर आता भूमिका चावलानेही या मदतकार्यात आपले योगदान दिले आहे.
इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करून तिने हा मेसेजही पोस्ट केला आहे. करोनाच्या साथीला आटोक्यात आणण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योगधंद्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता उद्योगांना पुन्हा उभे करण्याची गरज आहे.
ही गरज लक्षात घेऊन भूमिका चावलाने लघुउद्योगांचे प्रमोशन अगदी मोफत करण्याचे ठरवले आहे. ही माहिती तिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये दिली आहे. तिच्या या निर्णयाचे सर्वच स्तरांमधून कौतुक केले जाते आहे. “आपण सगळे एकमेकांच्या मदतीसाठी पुढे यायला पाहिजे.
जर कोणी एखाद्या लहान ब्रॅन्ड अथवा उद्योगासाठी काम करत असेल. तर त्याला मदत करायला पाहिजे. सगळी कामे पैशासाठी केली जाऊ शकत नाहीत.’ असे तिने म्हटले आहे.
भूमिकाने सलमान खान बरोबर “तेरे नाम’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर “दिलने जिसे अपना कहा’.”सिलसिला’ आणि “दिल जो भी कहे’ सारख्या सिनेमातूनही काम केले होते.