तळेगाव स्टेशन, दि 17 – पर्यावरण संवर्धनासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषदेमार्फत शहरात चार ठिकाणी ई-व्हेईकलचे चार्जिंग स्टेशन सुरू केले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी ई-व्हेईकलचा वापर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले आहे.
“माझी वसुंधरा’ हे अभियान तळेगाव शहरामध्ये राबविण्यात येत आहे. या अभियानात ओला-सुका कचरा वर्गीकरण करणे, अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतचा वापर करणे, सौर उर्जा साधने, इलेक्ट्रिक वाहन वापरणे, प्लास्टिक बंदी, कापडी पिशवी वापरणे, वृक्षारोपण करणे, वृक्षसंवर्धन करणे अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी तळेगाव शहरात चार ठिकाणी चार्जिंग स्टेशन सुरू केली आहेत. मारुती मंदिर चौक येथील नगर परिषद कार्यालय, सरदार अजितसिंहराजे व्यापारी संकुल “बी” विंग इमारतीचे पार्किंग, तळेगाव रेल्वे स्टेशन बाहेरील नगर परिषदेच्या सार्वजनिक शौचालयाच्या बाहेरील बाजूस आणि तळेगाव स्टेशन भागातील क्र. 3 च्या आवारात अशी चार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
तळेगावकर नागरिकांच्या सहकार्याने व सहभागाने आपले तळेगाव दाभाडे शहर प्रदूषणमुक्त ठेवता येणार असल्याने जास्तीत नागरिकांनी इलेक्ट्रिक जास्त नागरिकांनी वाहनांचा वापर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले आहे.
आकडे बोलतात…
इलेक्ट्रिक वाहनांची एकूण संख्या – 20,868
इलेक्ट्रिक दुचाकी वाहने – 18,991
इलेक्ट्रिक चारचाकी वाहने – 1,407
सार्वजनिक वाहतूक बसेस – 11
तीनचाकी वाहनांची संख्या – 390
मालवाहतूक वाहने – 8
मोटार कॅब्सची संख्या – 61