– मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीनानंतर आज उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्ष व निवडणूक चिन्ह धनुष्यबाण देखील गमवावे लागले आहे. निवडणूक आयोगात दोन्ही बाजूनी केलेल्या युक्तिवादनानंतर आज निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व धनुष्यबाण निवडणूक चिन्ह कोणाला याबाबत निर्णय दिला आहे. एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थक आमदारांना शिवसेना व धनुष्यबाण बहाल करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष व धनुष्यबाण मिळाल्यानंतर त्यांचे समर्थक नेते व मित्र पक्ष असलेल्या भाजप नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली असून यावेळी उद्धव ठाकरे समर्थकांवरही निशाणा साधला आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
‘हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारे एकनाथ शिंदे यांना शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याबाबत त्यांचे मनापासून अभिनंदन. एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे हे आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो. शिवसेना ही विचारांची शिवसेना आहे आणि हे विचार शिंदे साहेब पुढे घेऊन चालले आहेत. सेनेवर कोणी मालकी अधिकार सांगू शकत नाही. ज्याच्याकडे शिवसेनेचे हिंदुत्ववादी विचार त्याच्याकडे शिवसेना. यापूर्वीही निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या बाबतीत असा पेचप्रसंग निर्माण झाल्यानंतर ज्याच्याकडे अधिक व्होट पर्सेंटेज त्याच्याकडे पक्ष असाच निर्णय दिला आहे. एखाद्या पक्षाची ओळख ही व्होट पर्सेंटेजवर असते, त्यामुळे ज्याच्याकडे अधिक लोकप्रतिनिधी त्याच्याकडे व्होट पर्सेंटेज आणि पक्ष.’ अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
उद्धव ठाकरेंवर निशाणा…
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे व त्यांच्या समर्थकांवर निशाणा साधला. निवडणूक आयोगाचा निकाल विरोधात आला तर त्यांच्यावर दबाव, बाजूने आला तर निवडणूक आयोग स्वायत्त, सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला तर सर्वोच्च न्यायालय फ्री, विरोधात दिला तर दबावाखाली अशी त्यांची रीऍक्शन असते हे आम्हाला माहिती आहे. त्यांनी या निर्णयाला आव्हान देण्यासाठी जरूर सर्वोच्च न्यायालयात जावं हा त्यांचा अधिकार आहे.