कलंदर: बदल…

उत्तम पिंगळे

कालच प्राध्यापक विसरभोळ्यांकडे गेलो तर कित्येक बदलांना काळानुरूप केले गेले यावर त्यांचे कोणाशीतरी बोलणे चालू होते, एकूणच आशय असा होता.
प्राध्यापक काही चालीरितींवर बोलत होते. सतीप्रथा स्वातंत्र्यापूर्वी कायद्याने बंद झाली. जुनी काही कारणे असतील त्यासाठी पण काळानुरूप ती कालबाह्य झाल्याने हे केले गेले. बालविवाह, वेठबिगारी, बालमजुरी, हुंडाबंदी, अर्थात हुंडाबंदी असली तरी वेगळ्या नावाने थोडीफार चालू आहे पण प्रमाण खूप कमी झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिक्षणाने मोठी क्रांती घडून कित्येक बदल काळानुरूप केले गेले व ते स्वीकारले गेले. चंद्र-सूर्य ग्रहणे, धूमकेतू याबाबतच्या अंधश्रद्धा नवीन समाजात शिक्षणाने दूर झाल्या. विवाह, घटस्फोटाविषयी कायदे अमलात आणले गेले. औद्योगिक क्रांतीने उद्योगाची वाढ झाली. मुंबईमध्येही कापड गिरण्या जोमाने सुरू झाल्या होत्या. विविध यांत्रिकी व रासायनिक उद्योगही मोठ्या प्रमाणात सुरू झाले. त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगारही निर्माण झाला, पण बदल हे होतच असतात. आपण पाहिले आहे की, ऐंशीच्या दशकात कापड गिरण्यांचा संप होऊन मुंबईतील गिरण्या रसातळाला गेल्या. संप हे जरी तात्कालिक कारण असले तरी टेक्‍स्टाईल उद्योगात विविध आधुनिक यंत्रसामग्री आल्याने मोठ्या प्रमाणावर उत्पादन कमी खर्चात होऊ लागले. जुन्या गिरण्या आधुनिकीकरण न झाल्याने त्या या बदलापुढे टिकाव धरू शकल्या नाहीत.

एके काळी कोडॅक मोठी कॅमेरा रोल बनवणारी कंपनी होती. घड्याळ बनविणारी एचएमटी कंपनी होती. इतर अनेक सरकारी व यांत्रिकी उद्योगही होते जे बदलाला सामोरे गेले नाहीत व हळूहळू पूर्णपणे बंद झाले. 1991 नंतर अर्थव्यवस्था खुली केल्यावर जागतिक मालाशी आपली स्पर्धा सुरू झाली. त्यामध्ये दर्जा आणि किंमत यावर भर दिला गेला. त्यात अनेक आपले उद्योग जे पूर्वी नफा कमवत होते ते बंद झाले. मोबाइलचा वापर वाढू लागल्यामुळे कॅमेरा, रेडिओ, घड्याळ अशा कंपन्यांवर संक्रांत झाली. त्यातूनही ज्या उद्योगाने दूरवरची धोरणे राबवली ते तरले.

टाटांनी त्यांची टाटा ऑईल मिल्स ही साबण बनवणारी कंपनी विकली तेव्हा अनेकांनी भुवया उंच केल्या. पण याच उद्योगाने पुढे परदेशी कंपन्याही खरेदी केल्या हेही तितकेच खरे आहे. विप्रो सारखी कंपनी जी तेल व साबण निर्माण करणारी म्हणून उदयास आली पण संगणक व माहिती तंत्रज्ञानात पुढे क्रांतिकारी होणार हे त्यांनी जाणले व त्याच क्षेत्रात पूर्णपणे झोकून दिले. नवीन बदल अंगीकारला. आज विप्रो जगात नामांकित कंपनी गणली जाते. प्रत्येकाने काळानुरूप बदल अंगीकारला पाहिजे कारण शेवटी जगात बदल ही एक गोष्ट स्थिर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)