मनसेची ईडीला नोटीस

ईडी कार्यालयाचा फलक मराठीत नसल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

मुंबई – राज ठाकरे यांची साडेआठ तास चौकशी केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता थेट सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीला नोटीस पाठवली आहे. ईडी कार्यालयाचा फलक मराठीत लावण्यात यावा, अशी मागणी करत मनसेने ही नोटीस पाठवली आहे. यासंबंधी मनसे अधिकृतने ट्‌विट करत माहिती दिली आहे. मनसे याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहे. मराठी भाषा विभाग ईडीला मराठी फलकाची सक्ती करणार का? असा सवालही मनसेने विचारला आहे.

मनसे अधिकृतने ट्‌विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रात शासकीय फलक हे मराठीत असायला हवेत. हे ईडी कार्यालय बहुदा विसरले आहे. पण आम्ही याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे आणि या नोटिशीची प्रत ईडीला पाठवली आहे. मराठी भाषा विभाग ईडीला मराठी फलकाची सक्ती करणार?, असा सवाल करत या ट्‌विटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅगही केले आहे.

दरम्यान, ईडीच्या कार्यालयाबाहेर असणाऱ्या फलकावर हिंदीत प्रवर्तन निदेशालय असे लिहिण्यात आले आहे. तसेच त्याखाली इंग्रजीत Enforcement Directorate असे लिहिण्यात आले आहे. यात कुठेही मराठी भाषेत सक्तवसुली संचलनालय असे लिहिण्यात आलेले नाही. नेमका यावरच मनसेने आक्षेप नोंदवला आहे. यामुळे आता मनसेच्या मागणीनंतर मराठी भाषेतला फलक लागणार की नाही हे पाहावे लागणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.