पुणे – ग्रामीण भागात परवानगी घेऊन बांधकाम केलेल्या इमारतींमधील सदनिकांची जमिनीच्या मालकी हक्कात नोंद घेण्यासाठी 7/12 उताऱ्याच्या नमुन्यात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गृहप्रकल्पांची नोंद घेण्यासाठी सातबारा उताऱ्यातील बारा काढून त्या ठिकाणी सात “क’ आणि “ड’ असे नमुना समाविष्ट करण्यात आला आहे. सात “क’ मध्ये गृह प्रकल्पातील मोकळ्या जागांचा, तर सात “ड’ मध्ये प्रत्येक सदनिकाधारकाच्या मालकी हक्काची नोंद घालण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात सदनिकांचा कोणताही अभिलेख नसतो. सातबारा उताऱ्यावर संबंधित बांधकाम विकसकाचे नाव राहते. सदनिका धारकांच्या नावाची नोंद 7/12 उताऱ्यावर होत नाही. ग्रामीण भागातील सदनिका धारकांची नावाची नोंद सातबारा उताऱ्यावर सात “क’ यामध्ये घेतली जाणार आहे. यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती.
ऑनलाइन पद्धतीने सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी ही समितीने कार्यपद्धत निश्चित करण्यात आली आहे. या समितीची नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीमध्ये 7/12 उताऱ्याच्या नमुन्यात बदल करण्यात आला त्यातील बारा हे काढून टाकण्यात आले आहे. त्याऐवजी सात “क’ आणि सात “ड’ असे दोन नमुने तयार करण्यात आले असून त्यानुसार नोंदी घालण्यास सुरूवात करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले.
देशात पहिल्यांदाच ग्रामीण भागातील मंजूर असलेल्या बांधकामांमधील सदनिकांची नोंद स्वतंत्र अभिलेखात घेतली जाणार आहे. त्यामुळे सदनिका धारकांना हक्काचा अभिलेख मिळणार आहे. त्या सदनिकेवर अथवा गृहप्रकल्पावर काय स्वरूपाचा आणि किती रक्कमेचा बोजा आहे. हे देखील यातून कळणार आहे. तसेच सदनिकांचे हस्तांतरण, कर्ज काढणे सोपे होणार आहे.
– रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी