मुंबई : देशातील पाच राज्यांचा विधानसभा निवडणुकींचा कार्यक्रम नुतकाच जाहीर करण्यात आला. त्यानंतर देशातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसून काम करण्यास सुरुवात केली आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसहनेही पाच पैकी तीन राज्यांमधील निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यासंदर्भात माहिती दिली.
ज्योतिष्य, कर्मकांड नाकारणारे @PawarSpeaks आणि प्रबोधनकारांचा वारसा सांगणाऱ्या शिवसेनेचे खा.@rautsanjay61 भविष्यवेत्ते कधी झाले? उत्तर प्रदेश, गोव्यात सत्ता परिवर्तनाबाबत दावे समजू शकतो, पण छातीठोक भविष्यवाणी हे मनोरंजन आहे.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 11, 2022
उत्तर प्रदेशप्रमाणेच गोव्यातही भाजपाच्या विरोधात वातावरण असल्याचे त्यांनी सांगितलं असून उत्तर प्रदेशात सत्ता परिवर्तन होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही पवारांच्या दाव्याचं समर्थन केलं आहे. यावरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका करत टोला लगावला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केले आहे की,’ज्योतिष्य, कर्मकांड नाकारणारे शरद पवार आणि प्रबोधनकारांचा वारसा सांगणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे भविष्यवेत्ते कधी झाले? उत्तर प्रदेश, गोव्यात सत्ता परिवर्तनाबाबत दावे समजू शकतो, पण छातीठोक भविष्यवाणी हे मनोरंजन आहे. असा टोला चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत लगावला आहे.
“या दोन्ही महापुरुषांना खरोखरच ज्योतिष अवगत असेल तर त्यांनी गोवा, उत्तर प्रदेशबद्दल बोलण्यापेक्षा महाराष्ट्राबाबत भविष्य सांगावं. राऊत यांनी सांगावं की, शरद पवार पंतप्रधान कधी होतील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर कधी पडतील? याची भविष्यवाणी पवारसाहेबांनी करावी,” असंही ते म्हणाले.
यावर प्रतिक्रिया देत संजय राऊत म्हणाले,’त्यांना योग्य वेळी माहिती देऊ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम उत्तम सुरू आहे. येत्या १३ तारखेला पंतप्रधानांसोबत होणाऱ्या बैठकीत ते सहभागी होतील. शरद पवार यांच्याइतकी राजकारणाची, समाजकारणाची आणि व्यक्तिमत्वाची उंची आधी गाठा. तुमच्यासारखी जी टेकाडं आहेत त्यांना सह्याद्री किंवा हिमालयाच्या उंचीशी स्पर्धा करता येणार नाही,” असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं.