मुंबई – सुपरस्टार ‘अल्लू अर्जुन’चा बहुप्रतिक्षीत “पुष्पा द राइज’ हा चित्रपट 17 डिसेंबरला रुपेरी पडल्यावर प्रदर्शित झाला आहे. करोना काळात सुद्धा या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा टप्पा पार करत बक्कळ कमाई केली आहे. तर, ‘पुष्पा द राइज’च्या हिंदी व्हर्जनने आत्तापर्यंत 68.19 कोटींची कमाई केली आहे.
हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला असून, अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदन्नाची केमेस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. सध्या चित्रपटातील ‘स्रीवल्ली’ गाणं तुफान गाजलं असून, सर्वच जण या गाण्याच्या प्रेमात पडले आहे. आता तर या गाण्याचं मराठी व्हर्जन सुद्धा एकानं साकारलं आहे.
स्रीवल्लीचं मराठी व्हर्जन ऐकून रसिकांनीही या अवलियाला दाद दिली आहे. विजय खंदारे यांनं आपल्या युट्युब चॅनेलवर हे गाणं शेअर केलंय. हे गाणं विजय यानं फक्त मराठीत रचलं नाहीये, तर या गाण्याला व्हिडीओतूनही उतरवलंय. या व्हिडिओमध्ये एक गोंडस लव्हस्टोरी दिसून येत आहे. जणू असं वाटतं की पाहल्यांदा हे गाणं मराठीच साकारलं गेलं आहे.
विजय खंदारे या क्रिएटिव्ह कलाकाराने हे मराठी व्हर्जन गाणं आपल्या मोबाईल कॅमेऱ्याने शूट केलं आहे. 3 मिनिटं 44 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. त्यासोबत राधिका नागरमोटे, सुहासिनी गुल्हाने, मनिश पतंग्रे, रोशन चौधरी यांनी या व्हिडीओ काम केलं आहे. सध्या सोशल मीडियावर हे मराठी ‘स्रीवल्ली’ गाणं प्रचंड व्हायरल झालं असून, सर्वांची या गाण्यातील कलाकारांचं कौतुक केलं आहे. 29 डिसेंबरला स्रीवल्ली या गाण्याचा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता.