Chandra Arya : खलिस्तानी समर्थक पुन्हा एकदा कॅनडातील हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण भारतीय वंशाचे कॅनडाचे खासदार चंद्रा आर्य यांनी कॅनडातील सरे येथील खलिस्तान समर्थकांचा एक कथित व्हिडिओ शेअर केला आहे. त्याठिकाणच्या हिंदू लक्ष्मी नारायण मंदिराला खलिस्तानी लक्षय करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. ट्विटरवर प्रसिद्ध झालेल्या या व्हिडिओमध्ये चंद्रा आर्य यांनी ट्रूडो सरकारकडे याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.
चंद्र आर्य यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करताना,”जर काही अहवालांवर विश्वास ठेवायचा असेल तर, खलिस्तान समर्थकांनी गेल्या आठवड्यात सरे येथील शीख गुरुद्वाराबाहेर एका शीख कुटुंबाला शिवीगाळ केली. आता हेच खलिस्तानी गट सरे येथील हिंदू लक्ष्मी नारायण मंदिराला लक्ष्य करणार असल्याचे दिसून येत आहे. हे सर्व भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली केले जात असल्याचे आर्य यांनी सांगितले. मी पुन्हा कॅनडाच्या अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करून कारवाई करण्यास सांगत आहे.” असे म्हटले आहे.
Last week Khalistan supporters verbally abused a Sikh family outside a Sikh Gurdwara in Surrey BC according to some reports.
Now it appears the same Khalistan group want to create trouble at the Hindu Laxmi Narayan Mandir in Surrey.
All these are being done in the name of… https://t.co/szTznICBo0— Chandra Arya (@AryaCanada) November 20, 2023
कॅनडात हिंदू मंदिरांवर हल्ला होण्याची ही पहिलीच घटना नाही. खलिस्तानी दहशतवाद्यांनी यापूर्वीही अशा अनेक घटना घडवून आणल्या आहेत. एप्रिलमध्ये, BAPS स्वामीनारायण मंदिराची विंडसर, ओंटारियो, कॅनडात भारतविरोधी भित्तिचित्रे (भिंतीवर भारतविरोधी रेखाचित्रे किंवा लिखाण) करून तोडफोड करण्यात आली. याशिवाय फेब्रुवारीमध्येही असाच एक प्रकार उघडकीस आला होता. जानेवारीमध्ये, ब्रॅम्प्टनमधील एका हिंदू मंदिरावर मोठ्या प्रमाणात विरोधी घोषणा लिहिल्या गेल्याची घटनाही नोंदवली गेली होती.
चंद्र आर्य कोण आहे?
चंद्र आर्य हे मूळचे कर्नाटकचे आहेत. ते कॅनडाच्या कनिष्ठ सभागृहाच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये नेपियन, ओंटारियो या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात. आर्यने कौसली इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, धारवाड येथून व्यवसाय व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले. 2006 मध्ये ते कर्नाटकातून कॅनडामध्ये आले होते. ते इंडो-कॅनडा ओटावा बिझनेस चेंबरचे अध्यक्षही राहिले आहेत. त्यानंतर ते राजकारणात आले.