Sanjay Raut : शिवसेना (ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊ येथील फोटो पोस्ट केल्यानंतर राज्यात सध्या फोटो वॉर सुरु झाल्याचे दिसत आहे. कारण त्यानंतर त्यांना उत्तर देण्यासाठी भाजपकडून आदित्य ठाकरेंचा एका फोटो शेअर केला ज्यात ते मद्य पिताना दिसत आहेत. दरम्यान, या फोटोवर विचारण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे आणि नरेंद्र मोदींचा ब्रांड एकच आहे असं संजय राऊत म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरे यांच्या फोटोवर बोलताना संजय राऊत यांनी,”आदित्य ठाकरेंचा जो फोटो पोस्ट केला आहे त्यात नीट बघा. तो ग्लास आहे की डाएट कोकचा कॅन आहे? एकदा नीट बघा म्हणजे समजेल. मी कालही त्यावर उत्तर दिलंय. मोदींचे किती फोटो दाखवू? मोदी जे पितात तोच आदित्य ठाकरेंचा ब्रांड आहे.असे म्हणत भाजपला सणसणीत टोला लगावला आहे.
तसेच पुढे बोलताना “आदित्य ठाकरे डाएट कोक पित आहेत, हे दिसत असताना हे लोक इतके घाबरले की त्यांना फोटो पोस्ट करताना भान राहिलेलं नाही. ईडी आणि सीबीआय यांच्या हातात नसतील तर यांच्यासारखे डरपोक लोक नाहीत. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, कुणीही तोंडपाटिलकी करु नये हिंमत असेल तर समोर या असंही आव्हान संजय राऊत यांनी दिलं आहे. तसंच भाजपा म्हणजे भारतीय जुगारी पार्टी आहे “असेही संजय राऊत यांनी यावेळी म्हटले आहे.
संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना,”भाजपासारख्या लोकांच्या विरोधात आम्ही लढतोय म्हणून त्यांना आम्ही विकृत वाटत असू काही हरकत नाही. आम्ही जर गोष्टी काढायला गेलो तर देश सोडून निघून जातील. भारतीय जुगार पार्टी अर्थात गँबलिंग करणं हेच यांचं ध्येय आहे. नैतिकतचे धडे दुसऱ्यांना शिकवत असतात. मात्र यांच्यासारखी भ्रष्ट पार्टी दुसरी नाही” असेही राऊत म्हणाले.