चॅम्पियन्स मैदान सोडत नाहीत – गांगुली

धोनी आणि विराटशी लवकरच चर्चा करणार
मुंबई, दि. 23 -भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यावर लगेचच माध्यमांशी बोलताना महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहलीशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर धोनीचे कौतुक करताना तो एक चॅम्पियन आहे आणि चॅम्पियन कधीही लवकर मैदान सोडत नाहीत, असेही व्यक्त केले.

धोनीशी अजून भेट झालेली नाही. मात्र त्याच्याशीच नव्हे तर कोहलीशी देखील चर्चा करणार असून त्यांच्याकडून भविष्यातील योजनांबाबत माहिती करून घेणार असल्याचेही गांगुलीने सांगितले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातून मला देखील दीड वर्ष संघाबाहेर राहावे लागले होते.

अध्यक्षपदी येणारा दुसरा कर्णधार
मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणारा सौरव गांगुली हा दुसरा भारतीय कर्णधार आहेत. यापूर्वी माजी कर्णधार महाराजकुमार विजयनगरम यांनी मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम केले होते. त्यांनी 1936 साली तीन कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले होते. 1954 मध्ये ते अध्यक्ष बनले होते. 2014 साली लिटील मास्टर सुनील गावसकर यांना मंडळाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्‍त करण्यात आले होते.

मात्र त्यानंतर मी सरस कामगिरीच्या जोरावर संघात पुनरागमन केले आणि नंतरची दोन वर्षे सातत्यपूर्ण कामगिरी करून स्वतःला सिद्ध केले होते. त्यामुळे धोनीच्याबाबतही माझ्या त्याच भावना आहेत, असेही त्याने सांगितले.

कर्णधार विराट कोहलीबाबत बोलताना गांगुली म्हणाला, त्याच्याशी अद्याप माझे बोलणे झालेले नाही. मात्र, त्याच्याशी उद्याच चर्चा करणार असून त्याला जास्तीत जास्त मोकळीक देण्याचा माझा प्रयत्न राहील. भारतीय क्रिकेटची प्रगती त्याच्या नेतृत्वाखाली निश्‍चितच होणार आहे याचा मला विश्‍वास आहे. मी स्वत: कर्णधार होतो. त्यामुळे कर्णधाराच्या काय जबाबदाऱ्या असतात हे मला माहीत आहेत. विराट संघाचा कर्णधार असून तो व त्याची कामगिरी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे त्याच्यावर कोणतेही दडपण मला टाकायचे नाही, त्याला पूर्णपणे सहकार्य करणार आहोत, असेही गांगुलीने सांगितले.

माजी क्रिकेटपटू असलेल्या पाच व्यक्‍तींच्या हाती आम्ही मंडळाचा कारभार सोपवत आहोत. भारताच्या सर्वोत्तम माजी कर्णधाराच्या हातात मंडळाची सूत्रे आहेत. मंडळाच्या घटनेनुसार मंडळाच्या निवडणुका घेण्यात आल्या.
आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले. आता पुढील काळात मंडळाचे काम करताना तसेच संघाच्या प्रगतीसाठी सगळ्या गोष्टी सकारात्मकतेने करणे नव्या समितीची जबाबदारी आहे, असे प्रशासक समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.