सातारा – विधानसभा निवडणुकीत दुरवस्था झालेल्या छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलाच्या धावमार्गाची दुरुस्ती करण्यात आली असून हे संकुल लवकरच क्रीडाप्रेमींसाठी खुले होत आहे. येत्या दोन दिवसांत क्रीडाप्रेमी पुन्हा क्रीडा संकुलात सराव करताना दिसणार आहेत. वॉकिंग ट्रॅकच्या सपाटीकरणाचे काम बुधवारी दिवसभर सुरू होते.
विधानसभा निवडणूक व लोकसभा पोटनिवडणुकीत कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि सुमारे बावीस हजार कर्मचाऱ्यांना मतदानाचे साहित्य वाटप करण्यासाठी छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुलाचा ताबा जिल्हा प्रशासनाने घेतला होता. आचारसंहितेमुळे तब्बल 45 दिवस हे संकुल जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात राहिल्याने क्रीडाप्रेमींच्या दैनंदिन सरावाचा खोळंबा झाला होता.
निवडणुकीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य वाटपाच्या वेळी सातारा शहरात झालेल्या प्रचंड पावसाने संकुलाच्या प्रवेशद्वारापासून वॉकिंग ट्रॅकपर्यंत दलदल झाली होती. याशिवाय 80 बसेस या थेट संकुलातील खुल्या क्रीडांगणावर उभ्या करण्यात आल्या होत्या. या बसेसच्या येण्या-जाण्यामुळेही क्रीडांगणात राडारोडा झाला होता. निवडणूक प्रक्रिया संपून बारा दिवस उलटल्यानंतर हे क्रीडा संकुल जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांकडे पुन्हा सुपुर्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. बुधवारी दिवसभर वॉकिंग ट्रॅकचे रोलरने सपाटीकरण करण्यात आले. हे काम चार तास सुरू होते.
याशिवाय मैदानात खणण्यात आलेल चरदेखील ताबडतोब भरून घेण्यात आले. काही ठिकाणी वॉकिंग ट्रॅकची पातळी बिघडली होती. त्याची ही दुरुस्ती करण्यात आली. या संदर्भात तहसीलदार आशा होळकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्या म्हणाल्या, जिल्हा क्रीडा संकुल आहे त्या सुविधांसह जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांच्याकडे ताबडतोब हस्तांतरित करण्यात येत आहे.
डासांचा प्रादुर्भाव
छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुलाच्या पूर्वेकडील प्रवेशाद्वारावर प्रचंड कचरा साठला आहे. भिंत आणि चेन लिंक यांच्यामध्ये पाणी साठून डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. सरावासाठी येणाऱ्या क्रीडाप्रेमींना त्रास होत आहे. या पार्श्वभूमीवर आशा होळकर व युवराज नाईक यांनी आज संकुलाची पाहणी केली.