सातारा -राज्यातील गडचिरोली या नक्षलवादी भागात कौतुकास्पद केलेल्या कामगिरीची दखल घेऊन सातारा जिल्ह्यातील पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांच्यासह तीन पोलीस उपनिरीक्षकांना केंद्र शासनाच्यावतीने आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय सातारा जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक व सध्या कोल्हापूरला कार्यरत असलेले डॉ. अभिनव देशमुख यांनाही हे पदक जाहीर झाले आहे.
केंद्र सरकारच्यावतीने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना नक्षलवादी भागात खडतर सेवा पार पाडल्याबद्दल गृह विभागाच्यावतीने आंतरिक सुरक्षा सेवा पदक दिले जाते. महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व गोदिया जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भरघोस योगदान देणाऱ्या पोलीस अधिकायांना हे पदक जाहीर झाले आहे.
जिल्ह्यातील वाईचे उपअधीक्षक अजित टिके, मायणीचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, कुडाळचे पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे, पोलीस कल्याणचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ यांना हे पदक बुधवारी जाहीर झाले. पदकप्राप्त अधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील यांनी अभिनंदन केले.