रेल्वेतून पळती झाडे पाहू या…

मध्य रेल्वे प्रशासनाकडून चार वर्षांत 27 लाख वृक्ष लागवड

पुणे – मध्य रेल्वेने गेल्या चार वर्षांत सुमारे 27 लाख वृक्ष लागवड केली आहे. त्यापैकी 90 टक्के झाडे जगल्याचा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने केला आहे. मध्य रेल्वे आणि वन विभाग यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार प्रशासनाने रेल्वेच्या ताब्यात असलेल्या जागेत तसेच रेल्वे मार्गिकेच्या (रूळ) आसपास ही झाडे लावली आहेत. त्यामुळे पळती झाडे पाहू या… अशी एका गाण्यातील ओळ सार्थ ठरणार आहे.

वारंवार झाडे लावण्याचा संदेश विविध ठिकाणी दिला जातो. साधारण पावसाळ्याच्या सुमारास वृक्षारोपण केले जाते. मात्र, झाडे जगवण्याकडे दुर्लक्ष होते. महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाकडून 2015 पासून वृक्षारोपणाची मोहिम हाती घेण्यात आली असून, दरवर्षी ठराविक उद्दिष्ट ठेवून कोट्यवधी झाडे लावण्यात येतात. यामध्ये प्रामुख्याने स्थानिक प्रजातींच्या रोपे लावली जातात. या उपक्रमांतर्गत सर्व शासकीय विभागांना वृक्षारोपणासाठी उद्दिष्ट देण्यात येते. त्यानुसार रेल्वे प्रशासनाला देखील वृक्षारोपणासाठी ठराविक उद्दीष्ट देण्यात आले होते.

मध्य रेल्वेच्या पुणे, मुंबई, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर विभागांतर्गत मागील चार वर्षांमध्ये सुमारे 27.65 लाख झाडे लावण्यात आली आहेत. त्यापैकी सुमारे 25 लाख झाडे जगली आहेत. 2019-20 या वर्षामध्ये तब्बल 6.74 लाख रोपे लावण्यात आली आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

रेल्वेकडून स्वतंत्र नर्सरीची निर्मिती…
सन 2019 मध्ये मध्य रेल्वेने नव्याने 15 नव्या रोपवाटिकांची (नर्सरी) निर्मिती केली आहे. पुणे विभागातील संगम पार्क सह सीएसएमटी, कल्याण, शिर्डी, अहमदनगर, कुर्डुवाडी, वर्धा, सोलापूर, पंढरपूर, भुसावळ, मनमाड आदी ठिकाणांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.