येरवडा – रेशनिंग किटचे वाटप कंटेन्मेन्ट भाग असलेल्या येरवडा प्रभाग 6 मध्ये मोठ्या गोंधळानंतर पलिकेकडून सुरू करण्यात आले. मात्र, लक्ष्मीनगर येथील मातोश्री शाळेत नागरिकांना किट देताना फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याने शुक्रवारी (दि. 29) किट घेण्यासाठी आलेले नागरिक करोना घरी घेऊन गेले की काय? अशी शंका निर्माण झाली आहे.
महापालिकेचे कर्मचारी टोकन घेऊन रेशनिंग किट देण्याचे काम करीत आहेत; परंतु सोशल डिस्टन्स न ठेवताच हे काम सुरू आहे. किट घेण्यासाठी येणारा कंटेन्मेन्ट भागातील एखादा नागरिक करोना विषाणूने बाधित असेल तर यातून करोनाग्रस्त बाधितांची संख्या वाढू शकते. पालिकेचे मोफत रेशनिंग किटचे वाटप प्रभाग 6 मध्ये नगरसेवकांमार्फत करण्यात येत आहे. काही भागात हे कीट नगरसेवकांचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन देत आहेत तर काही ठिकाणी टोकन देऊन किटचे वाटप शाळांतून केले जात आहे.
लक्ष्मीनगर भागातील नागरिकांना रेशनिंग किटचे वाटप मातोश्री शाळेत करण्यात येत आहे. या नागरिकांनाही अगोदर टोकन देऊन त्यांनतर त्यांचे आधार कार्ड, रेशनिंग कार्ड तपासून रेशनिंग किट दिले जात आहे. येथेही किट वाटपावेळी रांग करताना फिजिकल डिस्टन्स ठेवला गेला नसल्याने करोनाबाधितांची संख्या वाढण्याचा धोका आहे. विशेष म्हणजे किट वाटप ही पालिकेची योजना असताना एकही जबाबदार अधिकारी या ठिकाणी नसल्याचे दिसून आले.
महापालिकेचे कर्मचारी व नगरसेवकांचे कार्यकर्ते किटचे वाटप करीत आहेत. फिजिकल डिस्टन्स नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या जातील.
– अनिल डमाळे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक