करोना नियंत्रणासाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल; दिले ‘हे’ निर्देश

नवी दिल्ली,  – करोनाची स्थिती चिंताजनक असलेल्या जिल्ह्यात अधिकाधिक लसीकरण, किमान 15 दिवसांचे नियोजन करून खासगी रुग्णालयांशी लसीकरणाचा करार आणि प्रत्येक बाधित व्यक्तीमागे किमान 20 व्यक्तीचे कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग करण्याचा सल्ला केंद्र सरकारने करोनाची लक्षणीय वाढ असणारी सहा राज्ये आणि दोन केंद्र शासित प्रदेशांना दिला आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि निती आयोगाचे सदस्य व करोना कृती दलाचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनी हरियाणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, गोवा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांच्या तसेच दिल्ली आणि चंदिगढ या केंद्रशासित प्रदेशांच्या अधिकाऱ्यांशी दूरदृश्‍य प्रणालीद्वारे तपशीलवार चर्चा केली. दिल्लीतील नऊ जिल्हे, हरियाणातील 15, आंध्र प्रद्रशातील 10, ओडिशातील 10, हिमाचलमधील नऊ, गोव्यातील दोन आणि चंदिगढमधील एका जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्यास सांगण्यात आले. या जिल्ह्यतीाल स्थिती चिंताजनक असल्याचे केंद्राने स्पष्ट केले. महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये तज्ज्ञांची पथके रवाना केली आहेत, असेही सांगण्यात आले.

भूषण यांनी प्रामुख्याने चार मुद्दे मांडले. या भागात रॅपीड अँटीजेन चाचण्याच्या तुलनेत अधिक विश्‍वासार्ह आरटी पीसीआर चाचण्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट वाढत आहे. कॉन्टीक्‍ट ट्रेसिंग कमी पडत आहे. प्रत्येक बाधिताच्या संपर्कात आलेल्या किमान 20 जणांचा शोध घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील पथकाचे नेतृत्व राष्ट्रीय साथ नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. के सिंग करत आहेत. तर आरोग्य मंत्रालयाच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी पी. रविंद्रन पंजाबमधील पथकाचे प्रमुख आहेत. ते परिस्थितीबाबत राज्याच्या मुख्य सचिवांना मार्गदर्शन करतील.
चौकट

गेल्या 24 तासांत 18 हजार 327 बाधीत सापडले.त्यातील 82 टक्के महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक आणि तामिळनाडूतील आहेत. तर देशात या काळात करोनामुळे 108 जणांचा मृत्यू झाला.त्यात महाराष्ट्रात 53, केरळात 16, पंजाबमध्ये 11, तमिळनाडूत पाच, कर्नाटकात चार आणि छत्तीसगढमधील तीन जणांचा समावेश आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात, कर्नाटक आणि हरियाणात बाधितांच्या संख्येत वाढ दिसत आहे. तर केरळ छत्तीसगढ आणि तामिळनाडूत गेल्या 24 तासांत सक्रिय बाधितांच्या संख्येत घट झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.