“करोनाला रोखण्यासाठीचा सुवर्णकाळ केंद्र सरकारने वाया घालवला”

काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांची सरकारवर टीका

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने डिसेंबर २०१९ मध्येच इशारा दिला होता. पण, करोनाला रोखण्यासाठीचा सुवर्णकाळ केंद्र सरकारने वाया घालवला,” असा आरोप काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी मोदी सरकारवर केला आहे. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येकडे लक्ष वेधत आझाद यांनी राहुल गांधी यांनी दिलेल्या इशाऱ्याची सरकारला आठवण देखील यावेळी करून दिली.

करोना संकटाविषयी गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेत बोलताना सरकारवर टीकास्त्र केले. “करोनाचा प्रसार रोखण्यासाठीचे सुवर्ण (महत्त्वाचे) महिने सरकारने वाया घालवले. जागतिक आरोग्य संघटनेनं डिसेंबर २०१९ मध्येच सावध केलं होतं. त्याचबरोबरच चीन आपला शेजारी देश असल्याने आपण अधिक सावध असायला हवे होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही देशात महामारी वाढत असल्याचा इशारा दिला होता,” अशा शब्दात टीका आझाद यांनी केली.

राज्यसभेत सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी उत्तर दिले. “८ जानेवारीपासून पंतप्रधान आणि राज्यांचे आरोग्य मंत्री या परिस्थितीला तोंड देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व मुख्यमंत्री ही लढाई लढत आहेत. देशात ३० जानेवारीला पहिला रुग्ण आढळल्याच्या आधीच सर्व सूचना आणि माहिती देण्यात आली होती. पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले होते. १६२ जणांना शोधण्यात आलं होतं. अशा पद्धतीने हे काम सुरू होते,” असे आरोग्यमंत्री म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.