नवी दिल्ली – कर्नाटक विधानसभा निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. तसेच प्रचाराच्या रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. पण त्याचबरोबर प्रचाराची पातळी दिवसेंदिवस घसरत असून याची केंद्रीय निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात आक्षेपार्ह टिपण्या आणि भाषणत प्रक्षोभक विधाने टाळण्याचे आदेश सर्व राजकीय पक्षांना देण्यात आले आहेत.
यासंदर्भात कठोर भूमिका घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना त्यांच्या भाषेवर संयम ठेवण्याचा इशारा दिला आहे. निवडणुकीदरम्यान वादविवाद होत असले तरी, त्याची पातळी घसरू देऊ नका, अन्यथा अशा पक्षांवर व नेत्यांवर कारवाई करावी लागेल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
राजकीय पक्षांसाठी निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. आदर्श आचारसंहितेचे पालन होत असल्याचे पाहतानाच अशा विधानांवर देखील बारीक लक्ष असल्याचे आयोगाने म्हटले आहे. विशेषत: राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक, प्रमुख नेत्यांच्या प्रचारावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेऊन कर्नाटक निवडणूक प्रचारादरम्यान केंद्रीय मंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून प्रक्षोभक भाषणे केली जात आहेत. ही भडकाऊ भाषणे असल्याची तक्रार कॉंग्रेसने केली असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. दोन्ही राजकीय पक्षांकडून तक्रारी आल्यानंतर, निवडणुकीचे वातावरण बिघडवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत.