नवी दिल्ली – देशातल्या अनेक शहरांमध्ये कांद्याच्या किरकोळ विक्रीच्या दराने शंभरी ओलांडली असल्याने हैराण झालेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने तुर्कीहून 11 हजार मेट्रीक टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयातीचे हे प्रमाण मागणीच्या तुलनेत खुपच कमी असले तरी बाजारातील कांद्याची आवक वाढून सध्याचे भाव कमी होण्यास मदत होईल असा अंदाज आहे. मात्र त्यालाही एक महिना जाऊ द्यावा लागेल अशी चिन्हे आहेत कारण आयात कांद्यासाठी ग्राहक पुरवठा मंत्रालयाने ऑर्डर दिली असली तरी तुर्कीचा कांदा प्रत्यक्ष भारतीय बाजारपेठेत दाखल होण्यासाठी डिसेंबर अखेर किंवा जानेवारीचा पहिला आठवडा उजाडण्याची चिन्हे आहेत.
सरकारने इजिप्तकडूनही सहा हजार 90 मेट्रिक टन कांद्याच्या आयातीची ऑर्डर नोंदवली आहे. 15 जानेवारीनंतर नव्या कांद्याचे पिक बाजारात उपलब्ध होणार आहे. तो पर्यंत कांदा चढ्या भावानेच घ्यावा लागणार अशी चिन्हे आहेत.