-->

…अरेरे! प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला माता-पित्यानेच झिडकारले अखेर शिशुगृहाचा आसरा

देहूगाव – महाविद्यालयात शिक्षण सुरू असताना जुळलेल्या प्रेमसंबंधातून “तिला’ मूल झाले. मात्र, या बाळाच्या संगोपनाची जबाबदारी जन्मदात्यांनी टाळली. अवघ्या 13 दिवसांच्या निरपराध बाळाला पोलिसांमार्फत आळंदी येथील शिशुगृहात सोमवारी रवानगी करण्यात आली. या घटनेने समाजाची मान पुन्हा एकदा खाली गेली आहे.

देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असणारी “ती’ पिंपरी-चिंचवड परिसरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तेथे एका तरुणाशी तिची मैत्री झाली. मैत्रीचे संबंध प्रेमात रूपांतरित झाले. त्यातून तिने दि.1 सप्टेंबर रोजी पिंपरी-चिंचवड परिसरातील रुग्णालयात गोंडस मुलाला जन्म दिला. या बाळाच्या संगोपनास प्रियकराने नकार दिला, तर प्रेयसीनेही संगोपनात असमर्थता दर्शवल्याने या बाळाला शिशुगृहात ठेवण्याचे निर्णय घेतला. अखेर ती देहूरोड पोलीस ठाण्यात आली.

झालेल्या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती देत तिने बाळाला पोलिसांमार्फत शिशुगृहात दाखल करण्याची मागणी केली. यावर बाल न्यायालयाच्या सूचनेनुसार सोमवारी सायंकाळी आळंदी रोड येथील रेणुका शिशुगृहात या बाळाची रवानगी करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक छाया बोरकर यांनी या प्रकरणाची नोंद केली असून, वैद्यकीय तपासणी करून या बाळाला संगोपन केंद्रात दाखल करण्यात आल्याचे सांगितले.’

“संबंधित तरुणीला तक्रार देण्याबाबत विचारले होते. मात्र, तिने तक्रार देण्यास नकार दिला. तसे अर्जही लिखित दिले आहे,’ असेही कल्याणकर यांनी सांगितले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.