पुणे- वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणारी राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा अर्थात “नीट’ रविवारी सुरळीतपणे पार पडली. ही परीक्षा तुलनेने सोपी गेल्याने वैद्यकीय प्रवेशाचा कटऑफ वाढण्याचा अंदाज आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्तरावरील होणारी “नीट’ परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने नीट परीक्षा रद्द न करता घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) ही परीक्षा विद्यार्थ्यांची आरोग्याची काळजी घेत देशभरात घेतली. सावधगिरीच्या उपायांची योग्य काळजी घेतली गेली.
रविवारी दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत ही परीक्षा झाली. पुण्यात सुमारे 23 हजार विद्यार्थ्यांनी विविध केंद्रांतून परीक्षा दिली. जीवशास्त्र आणि रसायनशास्त्रतील बहुतांश प्रश्न “एनसीईआरटी’च्या पाठ्यपुस्तकांवर आधारित विचारले गेल्याचे सांगण्यात आले. करोनाच्या काळात नीट परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी बराच कालावधी मिळाला. विद्यार्थ्यांनी या परीक्षेची योग्य तयारी केल्याने परीक्षा सोपी गेल्याचे दिसून येत आहे.
परीक्षा केंद्रात गेल्यानंतर सर्व तपासणी, मास्क, सॅनिटायझर यात पहिले 10 ते 15 मिनिटे विद्यार्थ्यांचा वेळ गेला. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना पेपर पूर्ण सोडवता आले नसल्याचे सांगण्यात आले.
यावर्षीची “नीट’ परीक्षा सोपी होती. त्यामुळे वैद्यकीय प्रवेशासाठी “कटऑफ’ वाढेल. विशेषत: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी 15 ते 20 गुणांचा “कटऑफ’ वाढण्याची शक्यता आहे.
– प्रा. दुर्गेश मंगेशकर, संचालक, आयआयटीन्स प्रशिक्षण केंद्र