उत्तरप्रदेशातील साखर कारखाने विकीप्रकरणी सीबीआय तपास सुरू

मायावती अडचणीत येण्याची शक्‍यता
नवी दिल्ली – उत्तरप्रदेशातील साखर कारखाने विक्री प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याच्या प्रकरणी सीबीआयने तपास सुरू केला. त्यामुळे बसपच्या प्रमुख मायावती अडचणीत येण्याची शक्‍यता आहे.

मायावती उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री असताना 2011-12 मध्ये सरकारी मालकीचे 21 साखर कारखाने विकण्यात आले होते. त्या विक्री प्रक्रियेत सरकारी तिजोरीचे तब्बल 1 हजार 179 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. त्या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याची शिफारस उत्तरप्रदेशातील भाजप सरकारने मागील वर्षी केली. आता त्या प्रकरणाचा तपास सीबीआयने हाती घेतला आहे. त्या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला. तसेच, सहा प्राथमिक चौकशींचीही (पीई) नोंदणी केली. तूर्त सीबीआयने उत्तरप्रदेशातील कुठल्या राजकीय नेत्याला किंवा सरकारी अधिकाऱ्याला आरोपी केलेले नाही. मात्र, तत्कालीन मायावती सरकारने बाजारमुल्यापेक्षा कमी दरात साखर कारखान्यांची विक्री करून सरकारी तिजोरीचे नुकसान केल्याचा आरोप आहे. त्यामुळे सीबीआय तपासाची धग मायावती यांच्यापर्यंत पोहचण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.