जम्मू-काश्‍मीर, अरुणाचल भारताचा अविभाज्य भाग – चीनची नरमाईची भूमिका

बीआरआय समिटमध्ये चीनच्या वाणिज्य मंत्रालयाचे नकाशे प्रदर्शित
बिजिंग – अरुणाचल प्रदेश आपला आहे, असा दावा करणाऱ्या चीनने अखेर नरमाईची भूमिका घेत जम्मू-काश्‍मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याचे मान्य केले आहे. बीजिंग येथे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह समिट सुरु असून यावेळी चीनने बीआरआय मार्गांचे नकाशे दाखवले. या नकाशांमध्ये जम्मू-काश्‍मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताचा भाग दाखवण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, भारताने सलग दुसऱ्यांना परिषदेवर बहिष्कार टाकूनही नकाशात भारत बीआरआयचा भाग असल्याचे दाखवण्यात आले आहे. तीन दिवसांच्या बीआरआय समिटमध्ये चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने हे नकाशे प्रदर्शित केले. चीनने जम्मू-काश्‍मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताचे अविभाज्य भाग दाखवणे तसे भारतासाठी आश्‍चर्यकारकच असून विरोधाभास निर्माण करणारे आहे.

याआधी चीनने अरुणाचल भारताचा अविभाज्य भाग दाखवणारे अनेक नकाशे नष्ट केले होते. हा चीनचा भाग असल्याचा दावा वारंवार चीनने केला असून भारतीय नेत्यांनी केलेल्या दौऱ्यांचाही निषेध केला आहे. याआधी चीनने त्यांच्या नकाशात जम्मू-काश्‍मीर हा पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरचा भाग असल्याचा दावा अनेकदा केला होता.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने जाणुनबुजून आखलेली ही रणनीती असण्याची शक्‍यता आहे. नोव्हेंबर महिन्यात चीनमधील चॅनेल सीजीटीएन टेलिव्हिजनने कराचीमधील चिनी दुतावासावर झालेल्या हल्ल्याचे वृत्त देताना पाकिस्तानच्या नकाशातून पाकव्याप्त काश्‍मीरही वेगळे दाखवले होते.

पाकिस्तानच्या नकाशातून पाकव्याप्त काश्‍मीर वेगळं दाखवण्याचा परिणाम चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कोरिडोअरवर (सीपीईसी) होण्याची शक्‍यता आहे. सीपीईसी पाकव्याप्त काश्‍मीरमधून जात असल्याने भारताने त्याचा विरोध केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.