बहुजन सम्राट सेनेच्या वतीने “डफली बजाओ’ आंदोलन
पिंपरी – करोना काळात महापालिकेने खरेदी केलेल्या वैद्यकीयसह अन्य उपकरणांच्या खरेदीमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे कोविडच्या नावाखाली करण्यात आलेल्या खरेदीची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बहुजन सम्राट सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. त्याकरिता महापालिका मुख्यालयासमोर गुरुवारी (दि.17) डफली बजाव आंदोलन करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना निवेदन देण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरात करोनाची परिस्थिती हाताळण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. करोनोसारख्या महामारीच्या काळातही भांडार विभागातील अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने भ्रष्टाचार करीत आहेत. यामध्ये लॅब केमिकल, आयटीआयसाठी साहित्य खरेदी, आयसीयु युनिट, ऍनेस्थेशिया वर्कस्टेशन, सोनोग्राफी युनिट, एमआरआयसाठी सिरिंज पंप खरेदी, एक्स रे मशीनसह शेकडो प्रकारच्या साहित्याची कोट्यवधींची खरेदी करण्यात आली आहे. ही खरेदी करताना थेट पद्धतीने तसेच बेकायदेशीर निविदा प्रक्रिया राबवून ठराविक ठेकेदारांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला आहे. बाजारभावापेक्षा अधिक दराने खरेदी करण्यात आली असून ही बाब अत्यंत गंभीर आहे.
भांडार विभागातील सहायक आयुक्त, भांडार अधिकारी आणि सहायक भांडारपाल यांच्या संपत्तीची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी. करदात्या नागरिकांचे पैसे या भ्रष्टाचाऱ्यांकडून वसूल करण्यात यावेत. महापालिकेच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या दरोडा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
बहुजन सम्राट सेनेचे संतोष निसर्गंध, क्रांती रिक्षा सेनेचे श्रीधर काळे, रोजगार निर्माण परिषदेचे अध्यक्ष बाबुराव मदने, भिमशाही युवा संघटनेचे शिवशंकर ऊबाळे, माता पिता संघाचे अध्यक्ष दादासाहेब खनके, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे बाळासाहेब बरगले,मानवहित लोकशाही पक्षाचे राजू धुरंदरे, भिमबाणा प्रतिष्ठानचे सिध्दार्थ सिरसाठ डफली बजाओ आंदोलनात सहभागी झाले होते.