नवी दिल्ली : बॅंक घोटाळ्यातील एका आरोपीला मस्कतहून आणण्यात केंद्रीय अन्वेषण विभागाला ( सीबीआय) यश आले आहे. या आरोपीचे नाव सनी कार्ला असे असून त्याच्या पत्नीलाही ताब्यात घेण्यात आले आहे, असे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.
नवी दिल्लीतील पंजान नॅशनल बॅंकेच्या दर्यागंज शाखेतून 10 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन व्हाईट टायगर स्टील प्रा. लि.चा संचालक सनी कार्लाने तारण ठेवलेला माल गुपचूप विकला. कार्ला, त्याची पत्नी पीएनबीचे तत्कालीन मुख्य व्यवस्थापक, व्यवस्थापक, आणि उप सरव्यवस्थापक यांच्याविरोधात 22 डिसेंबर 2016 रोजी गुन्हा नोंदवण्यात आला. मात्र, या तपासात फरार झालेला कार्ला सहभागी झाला नही. त्याच्या विरोधात 31 डिसेंबर 2016 रोजी रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली. त्याला मस्कतमध्ये अटक करण्यात आल्यानंतर त्याची माहिती भारताला कळवण्यात आली. त्यानंतर इंटरपोलच्या मदतीने त्याच्या प्रत्यार्पणासाठी ओमान सरकारशी चर्चा झाली.
मस्कतची राष्ट्रीय गुन्हे शाखा, ओमानमधील भारतीय दुतावास आणि सीबीआय यांनी समन्वय ठेवत कार्लाचा ताबा मिळवला. त्याला सीबीआय न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.