पिंपरी (प्रतिनिधी) -करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संपूर्ण देश लॉकडाउन केला आहे. या लॉकडाउनमुळे शहरातील सुमारे तीन हजार सलून दुकाने बंद आहेत. तर त्यामध्ये काम करणाऱ्या सुमारे 20 हजारांहून अधिक जणांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर त्यासोबतच सलूनमध्ये जाऊन आपल्याला हवी तशी दाढीची स्टाईल व केसांची रचना करून घेणाऱ्या नागरिकांवरही दाढी व केस वाढविण्याची वेळ आली आहे.
करोनामुळे सर्वच व्यावसायिक व त्यावर अवलंबू असणारी मंडळी अडचणीत आली आहेत. यामध्ये अनेकांना रोज रोख पैसे मिळतात. तर यामध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना दर आठ दिवसांना पगार दिला जातो. सलून बंद असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ दुकाने बंद राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. अनेक व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कर्ज काढून दुकाने सजवली आहेत.
एकीकडे कर्जाचे हफ्ते आणि दुसरीकडे लॉकडाउनमुळे बंद झालेला व्यवसाय अशी दुहेरी कात्रीत ही मंडळी सापडली आहेत. तर नियमित ग्राहकांचे केस, दाढी केल्यानंतर मिळणाऱ्या पैशांत कामगारांचा पगार व मालकाला काही हिस्सा असा हिशेब रोजच्या व्यवसायाचा भाग आहे. काही व्यावसायिकांकडे पगारी कामगार आहेत. तर काहींकडे जेवढे दाढी, कटिंग केले जातील त्यावर पैसे दिले जातात. त्यामुळे रोजच्या कमाईवर जीवन जगणाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.