बगमुळे सर्वच मेसेजेस कायमचे डिलीट
नवी दिल्ली : तात्काळ मेसेज आपल्या समोरच्या माणसांपर्यंत पोहचण्याचे काम मेसेजिंग ऍप व्हॉट्सऍप करते. व्हॉट्सऍपमध्ये युजर्सना सातत्याने नवनवे फीचर्स जरी मिळत असले तरी अनेक उणिवादेखील समोर येत आहेत. आता पुन्हा एकदा व्हॉट्स ऍपमध्ये एक धोकादायक बग असल्याचे समोर आले आहे. यामुळे हॅकर्स केवळ एक मेसेज पाठवून ऍप क्रॅश करु शकतात. एकदा ऍप क्रॅश झाल्यानंतर तुम्हाला ऍप अनइंस्टॉल करुन पुन्हा डाउनलोड करण्याशिवाय पर्याय नसणार आहे.
सायबर सिक्युरिटी फर्म चेकपॉइंटच्या तज्ज्ञांनी हा बग शोधला आहे. ग्रुप चॅटमध्ये टाकलेल्या एका मेसेजमुळे एकाचवेळी अनेक स्मार्टफोनमधील ऍप क्रॅश होऊ शकतात इतका धोकादायक हा बग असल्याचे चेकपॉइंटच्या तज्ज्ञांनी म्हटले आहे. याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, कारण अनेक लोकांसाठी संपर्क साधण्याचा किंवा संभाषणाचा व्हॉट्सऍप मुख्य मार्ग आहे. जगात 150 कोटींहून अधिक युजर्स व्हॉट्सऍप वापरतात, तर 10 कोटींहून अधिक ग्रुप्स आहेत.
जवळपास 65 अब्ज मेसेज दररोज व्हॉट्सऍपद्वारे पाठवले जातात. इतक्या मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे ग्रुपमध्ये केवळ एक मेसेज टाकून एकाचवेळी अनेक स्मार्टफोन्सना लक्ष्य केले जाऊ शकतं. ग्रुप ओपन करताच ग्रुप मेंबर्सचं ऍप क्रॅश होईल. महत्त्वाचे म्हणजे ग्रुप चॅट क्रेश झाले की, त्यासोबत चॅट हिस्ट्री सुद्धा डिलीट केली जाते. जोपर्यंत ऍप अनइंस्टॉल केलं जात नाही तोपर्यंत ऍप क्रॅश होत राहिल. पुन्हा इंस्टॉल केल्यानंतर युजर्स ग्रुप चॅटमध्ये जाऊ शकणार नाहीत किंवा हिस्ट्री देखील पाहू शकणार नाहीत.
दरम्यान, या बगबाबत माहिती व्हॉट्सऍपला देण्यात आल्यानंतर कंपनीने हा बग फिक्स केला आहे. तसेच कंपनीकडून व्हॉट्सऍप अपडेट करण्याचे आवाहन युजर्सना करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सऍप युजर्ससाठी इंडियन कम्प्यूटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीमने एक इशारा दिला होता. अँण्ड्राइड आणि आयओएसवर व्हॉट्सऍप वापरणाऱ्यांना एका बग (Bug) च्या माध्यमातून लक्ष्य केले जात आहे असे त्यांनी म्हटले होते.