पुणे – जिल्ह्यातील 746 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यातील 81 पूर्णतः, तर 14 ग्रामपंचायती अंशतः बिनविरोध झाल्या आहेत. एका ग्रामपंचायतीने निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे आता 650 ग्रामपंचायतींमधील 4,904 ग्रामपंचायत सदस्यांसाठी तब्बल 11 हजार 7 उमेदवार रिंगणात आहेत. या ग्रामपंचायतींसाठी दि.15 जानेवारी रोजी मतदान होईल.
करोनामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनानेही तयारी केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दि.30 डिसेंबर हा शेवटाचा दिवस होता.
त्यादिवसांपर्यंत 21,771 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीत 296 उमेदवारांचे 443 अर्ज बाद झाले. तर 21,374 उमेदवारांचे 21,623 अर्ज वैध ठरले होती.
निवडणुकीमुळे गावात वाद नको, म्हणून ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रयत्न स्थानिक नेत्यांनी केला आहे. त्याला काही प्रमाणात यश आले आहे. रस्त्याचे कामे न झाल्याने पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.