पन्नास विहिरींवरील केबल चोरीस

नेवासा तालुक्‍यातील देवगाव येथील प्रकार

नेवासा -नेवासा तालुक्‍यातील देवगाव येथे आठ दिवसांत पन्नास ते साठ शेतकऱ्यांच्या विहिरींवरील वीज पंपांच्या केबलची चोरी झाल्याचे उघड झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या होऊनही पोलीस यंत्रणा सुस्त असल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.

अन्यथा रास्तारोको आंदोलन करू
दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. असे असताना परिसरात सुरू असलेल्या चोऱ्यांचे सत्र थांबण्यास तयार नाही. यापूर्वी देखील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीवरील वीज पंप चोरीस गेले आहेत. तसेच आज रोजी पन्नास ते साठ विहिरींवरील वीज पंपांच्या केबल चोरी झाल्याने शेतकरी तो आणखी अडचणीत सापडला आहे. या चोऱ्यांचा तपास तत्काळ न लागल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवगाव हे मुळा कॅनॉलच्या लाभक्षेत्रातील गाव. त्यामुळे सधन व बागायती भाग म्हणून त्याची ओळख आहे. त्यामुळे या भागात विहिरी देखील मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु मागील वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे हातातोंडाशी आलेली उभी पिके पाण्याअभावी जळाली. त्याचबरोबर खरिपाचे पीक देखील वाया गेल्याने शेतकरी हातबल होऊन आर्थिक अडचणीत सापडून मेटाकुटीला आला आहे. आधीच संकटात असलेला शेतकरी शेतामध्ये असलेल्या विहिरीवरील वीज पंपांच्या केबल चोरीच्या सत्राने हबकला आहे. दुष्काळामुळे सध्या विहिरींत पाणी नाही.

त्यामुळे शेतकरी विहिरींकडे फिरकेनासे झाले आहेत. नेमका याच गोष्टीचा चोरट्यांनी फायदा उठवत रात्रीच्या वेळी विहिरीवर असलेल्या विज पंपांच्या कॉपर केबलवर डल्ला मारण्याचा धडाका लावला आहे. या भागातील आठ दिवसांत जवळपास पन्नास ते साठ शेतकऱ्यांच्या विहिरींवरील विज पंपांच्या केबलची चोरी होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचे किमान दोन ते तीन हजार रुपयांचे नुकसान होऊन केबल चोरीमुळे वीज पंप विहिरीबाहेर काढून पुन्हा सुरळीत करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.

साहेबराव मंडलीक, पत्रकार सोपान भगत, मोसिन पठाण, अमजत पठाण, भाऊसाहेब निकम, चांगदेव गिलबिले, बबन गिलबिले, विठ्ठल मुरकुटे, नूर सय्यद, जनार्दन लिंगायत, सुखदेव धाडगे, रोहिदास भगत, चांगदेव यादव, बाबासाहेब मोरे, महेश निकम, मनोज पंडित आदींसह इतरही शेतकऱ्यांच्या विज पंपांच्या केबल चोरीस गेल्या आहेत. याबाबत पोलिसांना कळवून देखील पोलिसांकडून केवळ बघ्याची भूमिका घेत जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून पोलिसांबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.