मुंबई: पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी आपल्या पालकमंत्री पदाचा राजीनामा मंगळवारी (दि.4) मुख्यमंत्री यांच्याकडे सोपविला आहे. त्यामुळे पुण्याचे नवे पालकमंत्री कोण? अशी चर्चा पुन्हा रंगली होती. या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. पुण्याचे पालकमंत्री म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर जळगावच्या पालकमंत्री पदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपकडून मंत्रिमंडळात खांदेपालट सुरु आहे. गिरीश बापट यांचे अन्न आणि नागरी पुरवठा खातं जयकुमार रावल यांना तर संसदीय कार्यमंत्रिपद विनोद तावडे यांना देण्यात आल्याची माहिती आहे. लोकसभेत भरगोस मताने निवडणून आल्यानंतर भाजपने विधानसभेत सुद्धा सरकार कायम ठेवण्यासाठी जोरदार तयारी सुरु केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.