मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाच्या बहुप्रतीक्षित विस्तारासाठी ३० डिसेंबरचा मुहूर्त मिळाला आहे. कॉंग्रेसच्या मंत्र्यांची यादी रखडल्याने विस्ताराला विलंब लागत असल्याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, ३० डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी पीटीआय’ला दिली आहे.
विधिमंडळाचे अधिवेशन समाप्त झाल्यानंतर लगेचच म्हणजे २३ किंवा २४ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे आधीचे वृत्त होते. मात्र, विस्तार आणखी लांबल्याची माहिती आता पुढे आली असून नवीन मंत्रिमंडळात कोण मंत्री होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Cabinet expansion in Maharashtra to take place on December 30: Congress sources
— Press Trust of India (@PTI_News) December 26, 2019
महाविकास आघाडीचा शपथविधी २८ नोव्हेंबरला पार पडला होता. या शपथविधीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सहा मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळत नव्हता. त्यामुळे विरोधकांच्या टीकेचा सामना देखील सत्ताधाऱ्यांना करावा लागला.
हिवाळी अधिवेशनासाठी महाराष्ट्र विकास आघाडीने तात्पुरते खातेवाटप जाहीर केले होते. शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीन पक्षांनी मिळून महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील, छगन भुजबळ, कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात, डॉ. नितीन राऊत यांनी २८ नोव्हेंबर रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली होती.