पोटनिवडणुकीसाठी इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून

  • दिघीत राजकीय बैठका, भेटीगाठी, पोस्टर बॉईज सक्रिय

चऱ्होली – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विद्यमान तीन नगरसेवकांचे करोना संसर्गामुळे निधन झाले. त्यामुळे रक्‍त झालेल्या जागांवर डिसेंबर महिन्यात पोटनिवडणूक होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात केली आहे. करोनाकाळात देखील भेटीगाठींना उधान आले आहे.
दिघी येथील नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचे 26 सप्टेंबरला करोनाने निधन झाले. त्यामुळे त्यांच्या जागा रिक्त झाली आहे. मुंबई महापालिका नियमानुसार नगरसेवक पद रिक्त झाल्यानंतर त्या ठिकाणी 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे. नगरसेवकांच्या निधनानंतर जागा रिक्त झाल्याने दिघी, बोपखेल प्रभागात इच्छुक असणारे कार्यकर्ते जोरदार तयारीस लागले असून आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून बसल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

दिघीतील रिक्त झालेली नगरसेवक पदाची जागा ही अनुसूचित जमाती करिता राखीव आहे. त्यामुळे या जागेवर आपली वर्णी लागावी याकरिता इच्छुक सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. याकरिता पक्ष बाजूला ठेवून सर्वपक्षीय आजी, माजी नगरसेवक यांच्या गाठीभेटी घडत आहेत. यामुळे नगरसेवकांचे राजकीय वजन वाढले असल्याची सुप्त भावना बळावली असली तरी राजकारणातील प्रत्येक पक्षातील किंग मेकर काय भूमिका घेणार? याकडे दिघीकर लक्ष ठेवून आहेत. तर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आतापासूनच सोशल मीडियावर जाहिरातींचा पाऊस पडत आहे. राजकीय रणधुमाळीची ही फक्त सुरुवात आहे. यात आणखी कोण कोणत्या नवख्यांची भर पडणार? व ही राजकीय रंगत किती रंगतदार होणार? याची उत्सुकता वाढीस लागली आहे.

पक्षाकडून चाचपणी : बाजी कोण मारणार?
सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार अजूनही गुलदस्तात असले तरी उमेदवार कोण द्यायचा याची चाचपणी व खलबतं सध्या सुरू आहेत. दिघीमधून अनेक जण इच्छुक आहेत. आज पाठिंबा दर्शविणारे दुसऱ्या दिवशी इच्छुक असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे राजकीय कुरघोडी करण्याची स्पर्धा आताच रंगत आहे. दिघीतील राजकीय वातावरण तापत असले तरी याच प्रभागातील बोपखेल गावात कुणी इच्छुक असल्याचे समोर आले नाही. त्यामुळे या भागात कमालीची राजकीय शांतता असल्यामुळे याचा कानोसा घेण्यासाठी काहीजण पुढे सरसावले आहेत. त्यामुळे आयत्यावेळी उमेदवार पुढे करून बोपखेल बाजी मारणार की सत्ताधारी पक्षश्रेष्ठी निवडणूक बिनविरोध करण्यात यशस्वी होतील, असे एकूण सर्व चित्र येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.