महापालिका ऑनलाइन सभांचा खेळखंडोबा

  • अधिकाऱ्यांना म्यूट अन अनम्यूटही कळेना : यापुढे प्रत्येक सभेला हजर राहावे लागणार

पिंपरी – करोनामुळे महापालिकेच्या विविध सभांना गर्दी होणार नाही याबाबत दक्षता घेतली जात आहे. त्यासाठी स्थायी समिती, सर्वसाधाराण सभा याला सदस्यांनी व अधिकाऱ्यांनी ऑनलाइन उपस्थिती लावावी, अशी सूचना आयुक्तांनी दिली होती. मात्र या ऑनलाइन सभांचा चांगलाच खेळखंडोबा झाला आहे. ऑनलाइन असताना आवाज न जाणे, व्यवस्थित न दिसणे यामुळे माहितीची देवाण-घेवाण करताना अडचणी येत आहेत. तर बैठकीमधूनच आयुक्तांना वारंवार अधिकाऱ्यांना तुम्ही अनम्यूट व्हा, अशा सूचना द्याव्या लागत आहे.

महापालिकांमध्ये विविध सभा या ऑनलाईन घेतल्या जात आहेत. स्थायी समिती व महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी नगरसेवक व अधिकारी कार्यालयातून किंवा घरून ऑनलाइन सहभागी होतात. मात्र त्यामध्ये अनेक अडथळे येत असल्याने नगरसेवकांना व्यवस्थित माहिती मिळत नाही. अधिकाऱ्यांकडे माहिती मागविल्यानंतर त्यांचा आवाज पोहोचत नाही. तसेच अनेक अधिकारीही गैरहजर असतात. त्यामुळे नगरसेवकांना योग्य माहिती मिळत नाही.

नुकतीच महापालिकेमध्ये स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीसाठी अधिकाऱ्यांना ऑनलाइन उपस्थित राहण्याचे आदेश होते. मात्र या बैठकीसाठी अनेक अधिकारी ऑनलाइनच्या नावाखाली गैरहजर होते. स्थायी समितीच्या सदस्यांनी बैठकीमध्ये पाणीपुरवठ्या बाबत माहिती मागविली. मात्र बैठकीला पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख रामदास तांबे गैरहजर होते. ऑनलाइनसाठी चौकशी केली असता ते ऑनलाइनही उपस्थित नव्हते. तर यावेळी सदस्यांनी शहरातील विकासकामांबाबत माहिती मागविली.

यावेळी आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना ऑनलाइन बोलण्यासाठी सांगितले. मात्र अधिकाऱ्यांना आवाज जात नव्हता. यावेळी आयुक्तांनी संबंधित आधिकाऱ्यांना वारंवार सांगितले की साहेब तुम्ही अनम्यूट करा. तुम्ही म्यूट आहात, अनम्यूट होऊन बोला. मात्र अधिकाऱ्यांना याबाबत काहीच उमजले नाही. त्यामुळे शेवटी आयुक्तांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन सदस्यांना माहिती घेण्याची विनंती केली. तसेच यापुढे सर्व अधिकाऱ्यांनी बैठकीच्या वेळी स्वतःच्या कार्यालयात उपस्थित राहण्याची सूचना केली. ज्यावेळी माहिती देण्यासाठी बोलावतील त्यावेळी सभागृहामध्ये उपस्थित राहण्याचीही सूचना केली.

नेटवर्कचाही घोळ
ऑनलाइन सभा सुरू आहेत. मात्र अनेकवेळा मोबाइलला नेटवर्क नसते. त्यामुळे सदस्यांनी माहिती मागविली असता त्यांच्याशी बोलताना आवाज जात नाही. तसेच कधी-कधी त्यांचाही आवाज येत नाही. त्यामुळे त्यांनी नेमकी कशाची माहिती मागविली आहे हे समजत नाही. त्यामुळे ऑनलाइन सभेला अडचण येत असल्याचे एका अधिकाऱ्यांने सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.