मुंबई – भारतातील महागाईचा दर 6 टक्क्यांच्या खाली आला आहे. यामुळे उत्साहित झालेल्या गुंतवणूकदारांनी मंगळवारी शेअर बाजारात बरीच खरेदी केल्याने शेअर बाजार निर्देशांक उंचावले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 402 अंकांनी वाढून 62,533 अंकावर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 110 अंकांनी म्हणजे 0.60 टक्क्यांनी वाढून 18,608 अंकावर बंद झाला. आज झालेल्या खरेदीचा फायदा इंडसइंड बॅंक, बजाज फायनान्स, इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, महिंद्रा,बजाज फिन्सर्व या कंपन्यांना झाला. तर नेस्ले, टाटा स्टील, मारुती, टायटन या कंपन्यांचे शेअर विकून गुंतवणूकदारांनी नफा काढून घेतला.
जागतिक बाजारात आज संमिश्र वातावरण होते. हॉंग कॉंग, जपान मधील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले तर दक्षिण कोरिया आणि चीनमधील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. युरोप आणि अमेरिकेतील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले.
राष्ट्रीय सांख्यिक विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर रिझर्व्ह बॅंकेने ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा म्हणजे सहा टक्क्यापेक्षा कमी झाला आहे. 11 महिन्यापासून महागाई वाढत होती. ती आता कमी झाली असल्याचे दिसून येते.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी अमेरिकेच्या व्याजदरवाढीच्या शक्यतेमुळे सोमवारी 138 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.
अमेरिकेच्या पतधोरण समितीची बैठक सध्या चालू आहे. बुधवारी उशिरा अमेरिका व्याजदरात किती वाढ करणार हा निर्णय स्पष्ट होणार आहे. त्यामुळे जागतिक बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजारात या आठवड्यामध्ये संदिग्ध वातावरण आहे.
रुपया घसरला –
दरम्यान शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले असले तरी महाग कच्चे तेल आणि अमेरिका व्याजदरात वाढ करण्याची शक्यता असल्यामुळे आयातदारांकडून डॉलरची मागणी वाढली. त्यामुळे रुपयाचे मूल्य आज 36 पैशाने कमी होऊन 82.87 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेले .