राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – खेड तालुक्यात खरेदी विक्रीचे व्यवहार आता शासनाच्या तिजोरीत मोठी भर घालताना दिसत आहे. तालुक्यात दुय्यम निबंधक कार्यालये एक नव्हे तर तीन कार्यालयातून खरेदी-विक्री व्यवहार सुरू असतात 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या अर्थिक वर्षात 38 हजार 952 दस्तनोंदणी पोटी 250 कोटी रुपयांचे उद्दीष्ट असताना तब्बल 290 कोटी 87 लाख रुपये शासनाला मिळाल्याची माहिती राजगुरूनगर येथील तहसीलदार कार्यालयाच्या आवारातील खेड क्रंमाक 1 च्या दुय्यम निबंधक वंदना पोळ यांनी माहिती दिली.
खेड तालुक्यातील खरेदी विक्री दस्तनोंदणीतून 264 कोटी 30 लाख रुपये मुद्रांक शुल्क म्हणून तर 26 कोटी 57 लाख नोंदणी फी म्हणून शासनाला मिळाले असल्याची माहिती दुय्यम निबंधक विशाल काटे आणि सुनील परदेशी यांनी दिली.
राजगुरूनगर तहसीलदार कार्यालयाच्या आवारातील दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 1 मध्ये या अर्थिक वर्षात 9527 दस्तनोंदणी होऊन 56 कोटी 21 लाख 36 हजार 722 रुपये नोंदणी शुल्का पोटी तर 7 कोटी 45 लाख 63 हजार 340 रुपये नोंदणी फी पोटी असे शासनाला 64 कोटी रुपये मिळवून 109 टक्के उदिष्टाच्या पुढे टप्पा गाठल्याची माहिती दुय्यम निबंधक वंदना पोळ यांनी दिली.
चाकणमध्ये 144 कोटी 92 लाख जमा
चाकण येथील दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 2 मध्ये या अर्थिक वर्षात 17 हजार 284 दस्तनोंदणी होऊन 133 कोटी 29 लाख 93 हजार 302 रुपये मुद्रांक शुल्कापोटी तर 11 कोटी 61 लाख 99 हजार 76 रुपये नोंदणी फी जमा होऊन 144 कोटी 92 लाख रुपये सरकारी तिजोरीत जमा झाल्याची माहिती दुय्यम निबंधक विशाल काटे यांनी दिली.
उद्दीष्ट 164.81 टक्के झाले
राजगुरूनगर येथील तिसर्या क्रमांकाचे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीत असणारे दुय्यम निबंधक कार्यालय गेल्या महिन्यात चांडोली येथे स्थलांतरित झाले. या अर्थिक वर्षात या कार्यालयात 12 हजार 141 दस्त नोंदणीपोटी 74 कोटी 79 लाख 71 हजार 540 रुपये मुद्रांक शुल्क तर 7 कोटी 51 लाख नोंदणी फी मिळून एकूण 82 कोटी 40 लाख 71 हजार 573 रुपये सरकारी तिजोरीत जमा होऊन उद्दीष्ट 164.81 टक्के झाल्याची माहिती दुय्यम निबंधक सुनिल परदेशी यांनी दिली.