मंचर -आंबेगाव तालुक्यातील पेट्रोल आणि डिझेल पंपचालकांनी अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही पेट्रोल अथवा डिझेल वितरीत करू नये, तसेच कुणालाही कॅन अथवा ड्रममध्ये डिझेल किंवा पेट्रोल देऊ नये.अन्यथा अशा पंपचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा प्रांत अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला.
मंचर (ता. आंबेगाव) येथे आंबेगाव तालुका पेट्रोल पंप चालक-मालक संघाची बैठक घेण्यात आली, त्यावेळी वरील इशारा देण्यात आला. तहसीलदार रमा जोशी म्हणाल्या की, प्रामुख्याने शेतकरी वर्गातून रोज डेअरीमध्ये दूध पोहोचवण्यासाठी दुचाकीमध्ये पेट्रोल टाकण्याची मागणी करतात.
यावर सहाय्यक जिल्हा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की तालुक्यातील गाव स्तरावरील सर्व दूध संकलन करणाऱ्या संस्थांना प्रत्येक शेतकऱ्याच्या वाडी-वस्तीवर जाऊन दूध संकलित करण्याच्या सूचना तहसीलदार यांच्या आदेशाने देण्यात आल्या आहेत, त्यामुळे शेतकरी बांधवांनी दूध घेऊन जाण्यासाठी पेट्रोलची मागणी करू नये.
तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर काही सरपंच-पदाधिकारी वाहतूक परवानगी देण्याबाबत ग्रामपंचायत लेटरपॅडवर परवानगी देत आहे, हे पूर्णपणे चुकीचे असून तसा अधिकार संबंधित ग्रामपंचायत अथवा पदाधिकाऱ्यांना नाही. हे नमूद केले.
तालुक्यातील सर्व पेट्रोलपंप चालकांनी दररोजचा पेट्रोल व डिझेल स्टॉकचा हिशोब ठेवायचा आहे. रोज महसूल व पोलीस विभागाकडून पडताळण्यात येईल.
शेती कामासाठी लागणारी ट्रॅक्टर, हार्वेस्टिंग मशीन आदी वाहनांना डिझेल देण्याबाबत सूट आहे; परंतु असे वाहन हे संबंधित पेट्रोल पंपावर घेऊन येणे आवश्यक आहे. पंपावर अत्यावश्यक सेवेच्या वाहनात इंधन भरताना वाहन चालकाला एक फॉर्म भरून द्यावा लागेल. जेणेकरून नंतर हे फॉर्म महसूल विभाग व पोलीस विभागाकडून तपासणी करून अनावश्यक इंधन भरल्याबाबत आढळले तर संबंधित वाहनचालक व मालक, तसेच पेट्रोल पंप मालकांवर यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाईल.
– रमा जोशी, तहसीलदार