जळगाव – ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज जळगावमधील पाचोरा येथे जाहीर सभा होणार आहे. मात्र या सभेपूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘संजय राऊत यांनी चौकटीत बोलावं, नाही तर मी उद्धव ठाकरे यांच्या पाचोऱ्यातील सभेत घुसून दाखवेल,’ असे म्हंटले होते. या विधानानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. यामुळे या सभेसाठी पाचोऱ्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
अशात आता एका पोस्टरची चर्चा चांगलीच रंगली आहे. या पोस्टरमध्ये गुलाबराव पाटील हरवले आहेत… असे लिहिले आहे. तसेच बुलढाण्यातील गावोगावी गुलाबराव पाटील यांच्या विरोधात पोस्टर्स लागले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पोस्टर्स लावणाऱ्यांनी गुलाबरावांच्या विरोधात आंदोलनही केलं आहे. विशेष म्हणजे आंदोलन करणारे आणि पोस्टर्स लावणारे ठाकरे गटाचे नाहीत. त्यामुळे गुलाबराव पाटील यांची अडचण अधिकच वाढली आहे. सध्या या पोस्टरची चर्चा स्थानिक पातळीवर रंगली आहे.
या पोस्टरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांचे नाव आहेत. पोस्टरवर गुलाबराव पाटील यांचा फोटो आहे. त्यावर पालमंत्री बेपत्ता असं लिहिलं आहे. तसेच शोधून देणाऱ्यांना 51 रुपये बक्षीस दिलं जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
दरम्यन, ठाकरे गटाकडून या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत कालच सभास्थळी दाखल होते. यावेळी त्यांनी सभास्थळाची पाहणी केली होती. आज होणाऱ्या या सभेमुळे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. याआधी झालेल्या सभांमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. आता या सभेत ते काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.